Maharashtra Election 2019 : राजकारणात प्रवेश... कधीच नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:42 AM2019-10-15T05:42:09+5:302019-10-15T06:04:01+5:30
अमृता फडणवीस यांची मुलाखत । कार्यकर्ते हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा
योगेश पांडे/कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१४ च्या तुलनेत आता स्थिती व निवडणुकीतील प्रचारातील भूमिका बदलली आहे. अगोदर केवळ मतदारसंघापुरता प्रचार मर्यादित होता, आता मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची धुरा आहे. मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले.
सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असताना अमृता फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रचारावर भर दिला आहे. यावेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
ग्रामविकासाला नवीन गती मिळेल.
ज्या दिशेने मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे ते पुढील पाच वर्षांत निश्चितच कायम असेल. ‘जलयुक्त शिवार’मुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता दूर झाली आहे. परंतु या योजनेत आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम झाले पाहिजे. ‘क्लायमेट सायन्स’वरदेखील भर दिला गेला पाहिजे. त्यामुळे शेतकºयाला तंत्रज्ञानाचा आधार मिळेल. सोबतच बचत गटाला जास्तीत जास्त ‘मार्केट’ मिळावे व यातून ‘स्टार्ट अप्स’ समोर यावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
नागपूरचा चेहरामोहरा बदलणार
‘लॉजिस्टिक’मध्ये प्रचंड बदल घडून येईल. ‘मिहान’च्या कामालादेखील गती मिळाली आहे. अडथळे दूर होत आहेत. २०० कोटी नागपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दिले आहेत. यामुळे पर्यटन व गुंतवणुकीला चालना मिळेल. नागपुरात दीक्षाभूमी, कोराडी, रामटेक या पर्यटन स्थळांना आवश्यक निधी दिला व येथील सुविधा वाढविण्यावर भर दिला. दीक्षाभूमीला तर ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. मागील पाच वर्षांप्रमाणेच विकासाची गती राहिली तर नागपूर २०३० मध्ये हे जगातील सर्वात जास्त प्रगती करणाºया अव्वल १० शहरात समाविष्ट होईल असे ‘वर्ल्ड इकॉनॉमी फोरम’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२४ पर्यंत शहराचा चेहरामोहराच बदलेल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
फेटरीकर माझे कुटुंबीयच
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात मागील पाच वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. फेटरीकर माझे कुटुंबीयच झाले आहेत. तेथे जाऊन मला समाधान मिळते. फेटरी हे आदर्श गाव झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. अगोदर तेथे अनेक समस्या होत्या. अंगणवाड्या, ग्रामविकास केंद्राचा विकास झाला आहे. परंतु तरुणांना जास्त रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. ‘फॅशन डिझायनिंग’साठी ‘सेटअप’ करतो आहे. यात तेथील महिलांना घरबसल्या रोजगार मिळू शकेल, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या जेवणासाठी असते काळजी
प्रचाराची व्यस्तता असल्यामुळे मुख्यमंत्री नियमित व्यायाम करू शकत नाहीत. त्यांची झोपदेखील पूर्ण होत नाही. जेवणाची वेळदेखील पाळता येत नाही, त्याची काळजी वाटते. मात्र मुख्यमंत्री जेथेही जातील त्यांच्या आहारासंदर्भात मी आवश्यक त्या सूचना ‘स्टाफ’ला देते. त्यातही अनेकदा बाहेर खावे लागते. परंतु आता लोक ‘डायट फूड’ देत असल्याचे दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
2014 पर्यंत महाराष्ट्र व नागपुरातील अनेक प्रकल्प केवळ फायलींमध्ये होते. ते प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात केवळ सुरूच झालेले नाहीत, तर त्यांना गती मिळाली आहे. ‘स्मार्ट सिटी’पासून ‘जलयुक्त शिवार’, मेट्रो, समृद्धी महामार्ग, शिक्षणसंस्था, ग्रामविकासापर्यंत विविध मुद्यांत मुख्यमंत्र्यांनी चौफेर लक्ष दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केवळ नागपूरच नव्हे तर इतर शहरांतदेखील विकास घडवून आणला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्हिजन’मुळे विकास दिसून येत आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.