पर्यावरणदिनी अजनीवनासाठी आंदाेलनसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:02+5:302021-06-06T04:07:02+5:30
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते शनिवारी अजनीवन येथील वृक्षताेडीविराेधात सुरू असलेल्या आंदाेलनात उतरले. त्यांनी अजनीतील झाडांना कवटाळून आपचे विदर्भ संयोजक ...
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते शनिवारी अजनीवन येथील वृक्षताेडीविराेधात सुरू असलेल्या आंदाेलनात उतरले. त्यांनी अजनीतील झाडांना कवटाळून आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय काॅंसिल मेंबर अमरीश सावरकर, शहर सचिव भूषण ढाकूलकर, राज्य युवा समिती सदस्य कृतल आकरे, विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, रोशन डोंगरे, सुरेंद्र समुद्रे, अजय धर्मे, प्रभात अग्रवाल, गिरीश तीतरमारे, प्रितिक बावनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. देवेंद्र वानखेडे म्हणाले, आयएमएस प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यात ४५९० झाडे दर्शविण्यात येत आहेत, पण चारही टप्प्यात अजनीसह एफसीआय, कारागृह व पाटबंधारे विभागाच्या परिसरातील मिळून ४० हजारांवर झाडे कापली जाणार आहेत. ही जनतेची दिशाभूल करण्याचे काम आहे. १००-१५० वर्षांपासून असलेल्या या झाडांना कापल्याने हाेणारे नुकसान भरून निघणारे नाही. आयएमएस प्रकल्पाला विराेध नाही, पण ४० हजार झाडे कापून हाेणारा प्रकल्प मान्य नाही आणि आम्ही वृक्षताेड हाेऊ देणार नाही, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
युवासेनेची आदित्य ठाकरे यांना विनंती ()
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवासेनेतर्फे अजनी चाैक, वर्धा राेड येथे अजनीवनातील वृक्षताेडीविराेधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. युवासेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे यांनी सांगितले, महापालिकेतर्फे झाडे ताेडण्यासाठी आक्षेप मागविण्यात आले आहेत. एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षताेड करणे दुर्दैवी आहे. आम्ही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मनपाकडे सादर करणार आहाेत. याशिवाय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही अजनीवन वाचविण्यासाठी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक गणेश डोईफोडे, जिल्हा सचिव सलमान खान, जिल्हा प्रमुख शुभम नवले, अमोल गुजर, राज तांडेकर, तुषार कोल्हे, प्रतीक ठोमरे, सचिन निबरते, संजय डोकरमारे, हर्षल दरडेमल, विक्की निनावे, नितेश सोनकुसरे, श्यामल अहेरराव आदी उपस्थित हाेते.
सीटूतर्फे मूक आंदाेलन ()
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटूतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अजनी भागातील वृक्षतोडीच्या विरोधात संविधान चाैक येथे मूक आंदोलन करण्यात आले. भांडवली विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल बंद करा, अशा घाेषणा देत झाडांच्या कत्तलीला विराेध करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, शालिनी सहारे, नासिर खान यांनी केले.