नीरीच्या मदतीने पर्यावरण अहवाल
By admin | Published: October 3, 2016 02:36 AM2016-10-03T02:36:36+5:302016-10-03T02:36:36+5:30
नागपूर शहरातील नद्या व तलावातील जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे.
नद्या व तलावांचा अभ्यास : पाच वर्षांत अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव
नागपूर : नागपूर शहरातील नद्या व तलावातील जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. असे असतानाही एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नागनदी, पिवळी नदी व तलावांतील पाणी वापराजोगे असल्याबाबतचा अहवाल सादर केला होता. यामुळे महापालिक ा प्रशासनावर सर्वस्तरातून टीका झाली होती. त्यामुळे आता राष्ट्रीय पर्यावरण अनुसंधान संस्था (नीरी) च्या सहकार्याने पर्यावरण अहवाल तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
नीरीकडून महापालिकेला या संदर्भात सहमती पत्र मिळाले आहे. त्यानुसार २०२०- २१ सालापर्यंत हा अहवाल तयार करून सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र इन्व्हारमेंट पॉवर लिमिटेड यांच्याकडून पर्यावरण संदर्भात उपलब्ध माहिती महापालिक ा नीरीला उपलब्ध क रणार आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीवर नीरी यावर संशोधन करून अहवाल तयार करणार आहे.
खासगी संस्थेच्या अहवालावरून टीका झाल्याने महापालिका आयुक्तांनी पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी नीरीची मदत घेण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता (वाहतूक) यांना १५ मार्च २०१६ रोजी दिले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०१६ ला या संदर्भात कार्यादेश देण्यात आले होते.
नियमानुसार दरवर्षी राज्य सरकारला पर्यावरणाबाबतचा अहवाल पाठवावा लागतो. त्यानुसार महापालिके तर्फे दरवर्षी अहवाल तयार केला जातो. २०१६ -१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा अहवाल तयार करण्याला नीरीने सहमती दर्शविली आहे. पाच वर्षांच्या अहवालावर १ कोटी २६ लाख ५० रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी यावर २० ते २४ कोटींचा खर्च होईल. तसेच यावरील १५ टक्के सेवाकर म्हणजे १६.५० लाख अतिरिक्त खर्च करावे लागतील. (प्रतिनिधी)
खासगी कंपनीचा सदोष अहवाल
महापालिकेने विदर्भ इन्व्हारमेंट प्रोटेक्शन लिमिटेड यांच्या मदतीने पर्यावरण अहवाल तयार केला होता. परंतु तो सर्व्हे न करताच सादर केल्याने सदोष होता. त्यामुळे यावर सर्वस्तरातून टीका झाली होती.