पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 08:31 PM2020-08-25T20:31:46+5:302020-08-25T20:32:54+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा निश्चय जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा निश्चय जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने केला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ५६१ ग्रामपंचायतींमध्ये श्रमदान करून सुमारे २ टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेच्या शाश्वत कामांसोबतच घनकचऱ्याचे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे. यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे असून त्याचे संकलन करून पूर्णचक्रीकरण करणे काळाची गरज आहे. हा विचार ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी गणेशोत्सव हे प्रभावी व्यासपीठ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२० अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार पहिल्याच दिवशी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींमध्ये आज उत्स्फूर्तपणे श्रमदानातून प्लास्टिक संकलन करण्यात आले. यात ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. श्रमदानातून प्लास्टिक संकलन उपक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये जाऊन श्रमदान केल्यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळाले. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सामूहिक श्रमदान
जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राचे सदस्य तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे सर्व सल्लागार पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सामूहिक श्रमदान करीत असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी सांगितले.