ईपीएफओची वेबसाईट जाम; कर्मचारी त्रस्त, अकाऊंट अपेडेशन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:01 PM2022-02-10T12:01:01+5:302022-02-10T12:04:08+5:30
सर्व कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वेबसाईट संचलनाची गती अत्यंत मंद झाल्याने आणि त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करणे अवघड होत आहे.
नागपूर : ईपीएफओच्या कार्यप्रणालीला आधीच कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आता पीएफ वेबसाईट जाम होत असल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पीएफ कर्मचारी वेबसाईट ओपन करताना निर्माण होत असलेल्या अडचणींमुळे त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, सर्व कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वेबसाईट संचलनाची गती अत्यंत मंद झाल्याने आणि त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करणे अवघड होत आहे. पीएफ खात्यामधील जमा होत असलेला एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन निधी ई-पास बुकमध्ये तत्काळ अपडेट होत नसल्याची तक्रार सर्वच कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत असलेल्या मेसेजेसमध्ये ही बाब स्पष्ट होत आहे.
व्याज देण्यास उशीर
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला कर्मचाऱ्यांचा कॉन्ट्रिब्युशन खात्यात जमा करण्याचा नियम भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. या प्रक्रियेत एक - दोन दिवस उशीर झाल्यास १४बी व ७क्यू अंतर्गत इंटरेस्ट डॅमेज वसूल केला जातो. मात्र, कर्मचाऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत व्याज जमा करण्यास सातत्याने उशीर होताना दिसत आहे. दरवर्षी यात उशीर होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात ८ ते १० महिन्यांचे व्याज जमा करण्यात आले आहे. अशा स्थितीत कंपन्यांसाठी लागू करण्यात आलेला नियम ईपीएफने स्वत:साठीही लागू करणे गरजेचे आहे.
रिटर्न्स फाईल कसे करणार?
२.५ लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या व्याजावर टॅक्स लागेल, असा नियम आणण्यात आला आहे. परंतु, वेळेवर व्याज जमा होत नसल्याने, नागरिकांकडून रिटर्न्स फाईल कसे केले जातील, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
...या समस्या कधी संपणार?
- पीएफची वेबसाईट उघडण्यास अडचणी येत आहेत.
- कॉन्ट्रिब्युशन जमा झाल्यावरही ई-पासबुक अपडेट केले जात नाही.
- मंद गती असल्याने ई-नॉमिनेशनमध्ये अडचणी.
- पीएफवर मिळणारे व्याज जमा करण्यात उशीर.