महामारीत लाखो लोकांचे भरले पोट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:32+5:302021-06-29T04:07:32+5:30
शिवभोजन थाळी केंद्र - १५ आतापर्यंत किती जणांनी घेतला लाभ - ७ लाखावर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना ...
शिवभोजन थाळी केंद्र - १५
आतापर्यंत किती जणांनी घेतला लाभ - ७ लाखावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब, कष्टकऱ्यांसाठी शिवभाजेन थाळी वरदान ठरली. या योजनेमुळे महामारीत लाखो लोकांचे पोट भरता आले. नागपूरचाच विचार केला तर याला चांगला प्रतिसाद असून केंद्रांची संख्या आणखी वाढवण्याची मागणी होत आहे.
राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. कोरोना काळात तिचा अतिशय चांगला लाभ झाला. लॉकडाऊनमध्ये गरीब, कष्टकरी लोकांचा पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा शिवभाेजन थाळी मोठा आधार ठरली. नागपुरात सुरुवातीला १० केंद्र सुरु झाले. प्रत्येक केंद्राला ७५ थाळी वितरित करण्याची परवानगी होती. नंतर ही संख्या १५० वर वाढवण्यात आली. आणि नंतर पुन्हा वाढ केली. सध्या प्रत्येक केंद्रात २०० थाळी वितरित केल्या जातात. नागपुरात सध्या एकूण १५ शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेत. ही संख्या ४० पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिली असून प्रशासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.
बॉक्स
प्रति थाळी ४० ते ५० रुपये अनुदानही
शिवभोजन थाळी नागरिकांना १० रुपयाला दिली जाते. यात दोन पोळ्या, २०० ग्रॅम भात, डाळ आणि भाजी असते.
कोरोना काळात ही थाळी ५ रुपयात देण्यात आली. सध्या मोफत दिली जात आहे. १० रुपयाच्या थाळीवर राज्य सरकारकडून ४० रुपये अनुदान दिले जाते. ५ रुपयात थाळी विकली तेव्हा ४५ रुपये अनुदान दिले गेले आणि आता मोफत थाळी दिली जात असताना पूर्ण ५० रुपये अनुदान राज्य सरकारकडून दिले जात आहे.
बॉक्स
थाळींची संख्या वाढत गेली
नागपुरात थाळींची संख्या वाढत गेली. सुरुवातीला एका केंद्राला ७५ थाळींची परवानगी होती. ती पुढे दुप्पट होऊन १५० झाली. नंतर २१५ पर्यंत पोहोचली. नागपुरात दररोज किमान २ हजार थाळी वितरित होतात.
बॉक्स
केंद्रचालक म्हणतात
नवीन केंद्र तातडीने सुरु व्हावी
शिवभोजन थाळी ही खऱ्या अर्थाने गरिबांसाठी वरदान आहे. शासनाचे अनुदानही वेळोवेळी मिळत आहे. परंतु ही संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. सध्या नागपुरात १५ केंद्र आहेत. शासनाने एकूण ४० केंद्रांना परवानगी दिली आहे. उर्वरित केंद्र प्रशासनाने तातडीने सुरु करावीत.
निजाम अंसारी
शिवभोजन थाळी केंद्र चालक
बॉक्स
अनेकांसाठी ठरली वरदान
कोरोना काळात शिवभोजन थाळी अनेकांसाठी वरदान ठरली. कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा प्रत्येक केंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक लोकांना थाळी वाटण्यात आली. शासनाने ४० केंद्रांना मंजुरी दिली आहे. १५ सुरु आहे. उर्वरितांना सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.
भास्कर तायडे,जिल्हा पुरवठा अधिकारी