मिरगी हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:32+5:302021-02-10T04:09:32+5:30
नागपूर : विवाहापूर्वी मिरगीची माहिती भावी पती किंवा पत्नीला द्यावी. गैरसमजूत आणि सत्यता यावर प्रकाश टाकावा. मिरगी हे कायद्याने ...
नागपूर : विवाहापूर्वी मिरगीची माहिती भावी पती किंवा पत्नीला द्यावी. गैरसमजूत आणि सत्यता यावर प्रकाश टाकावा. मिरगी हे कायद्याने घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, यावर मेंदूरोग तज्ज्ञांनी भर दिला. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय मिरगी दिना’च्या निमित्ताने ‘मिरगीचे मानसिक आणि सामाजिक पैलू’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात मेंदूरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. जे.एम.के. मूर्ती यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. प्रवीणा शहा प्रामुख्याने उपस्थित होत्या. बंगळुरूचे डॉ. एच. व्ही. श्रीनिवास, केरळचे डॉ. राजेंद्रन, कोलकाताचे डॉ. गौतम गांगुली, चंदीगडचे डॉ. परमप्रीतसिंग खरवंदा, मुंबईच्या डॉ. कॅरल डिसूझा, लखनौचे डॉ. अतुल अग्रवाल, चेन्नईचे डॉ. मीनाक्षीसुंदरम यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय संयोजक प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते.
: समाजामध्ये मिरगीबाबत जनजागृतीची गरज : डॉ. शहा
डॉ. शहा म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीला वयाच्या विसाव्या वर्षात जर मिरगीचा अटॅक आला तर त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या कालावधीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रुग्णाने वेळीच आजाराचा स्वीकार केला नाही, पालकांनी त्याची काळजी घेतली नाही आणि समाजाने सहकार्य केले नाही तर त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खराब होते. त्यामुळे लवकर निदान, उपचारांची गरज असते. त्याकरिता समाजामध्ये या आजाराबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.
: मिरगीच्या रुग्णांनी निराशा दूर ठेवावी : डॉ. राजेंद्रन
निराशा ही समस्या मिरगीच्या रुग्णांमध्ये विविध प्रकारे उद्भवू शकते. मानसिक व सामाजिक कारणांनीदेखील रुग्णांमध्ये निराशा येते. मिरगीच्या रुग्णांनी नेहमीच सकारात्मक विचार ठेवून उपचाराला सामोरे जावे, असा सल्ला डॉ. राजेंद्रन यांनी दिला. मिरगीसंदर्भातील ऑर्गेनिक आणि सायकॉलॉजिकल समस्यांबद्दल डॉ. गांगुली यांनी चर्चा केली. यावर डॉ. अग्रवाल, डॉ. कॅरल डिसूझा आणि डॉ. श्रीनिवास यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. कॅरल डिसूझा यांनी रुग्णांना अतिसुरक्षा, परावलंबीत्व यामुळे रुग्णांच्या समस्या आणखी वाढतात, असे सांगितले. डॉ. खरवंदा यांनी मिरगी असलेल्या किशोरवयीन मुलांचे खूप वेगळ्या समस्या असतात. डॉक्टरांना संतुलन साधून त्यांच्यावर उपचार करावेत, असे मत मांडले. डॉ. मेश्राम यांनी मिरगी हा मेंदूचा घातक आजार असून त्यावरील उपचाराची माहिती दिली. संचालन डॉ. सुधीर भावे यांनी तर आभार डॉ. मीनाक्षीसुंदरम यांनी मानले.