नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मते निघाली समान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:04 PM2019-05-30T21:04:13+5:302019-05-30T21:05:31+5:30
नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते समान निघाली आहेत. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्याने ती रात्री उशिरापर्यंत चालली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते समान निघाली आहेत. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्याने ती रात्री उशिरापर्यंत चालली.
ईव्हीएम हॅक करून मतांची हेराफेर करता येत असल्याचा दावा करण्यात येत होता. यामुळे अनेकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत होती. अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमचा विरोध केला. ईव्हीएमवर मतदान न घेता मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आली. या व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांचीसुद्धा मोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची (मतपत्रिका) मोजणी करण्यात आली.
नागपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील ३० व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करण्यात आली. गेल्या गुरुवारी ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. काही विधानसभेची मोजणी लवकर सुरू झाल्याने तेथील व्हीव्हीपॅटची मोजणी आधी झाली तर काहींची नंतर साधारणपणे ९ वाजेपासून व्हीव्हीपॅटची मोजणी सुरू झाली. ती रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत चालली. दरम्यान तसेच मॉक पोल दरम्यान झालेली मते क्लिअर (रद्द) न केल्याने पाच व्हीव्हीपॅटमधील मतांचीसुद्धा मोजणी करण्यात आली नाही. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते सारखीच निघाली. व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी ईव्हीएममधील मतांच्या मोजणीनंतर झाली. एकाही ठिकाणी तफावत आढळून आली नसल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली.
रामटेकच्या व्हीव्हीपॅटची मोजणी सकाळपर्यंत चालली
रामटेक लोकसभा मतदार संघात एकूण २५ फेऱ्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार होती. त्यांची ईव्हीएमची मोजणीही जवळपास ११ वाजेपर्यंत चालली. परंतु व्हीव्हीपॅटची मोजणी सकाळपर्यंत सुरू होती.