नागपुरात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:56 PM2018-06-13T22:56:05+5:302018-06-13T22:56:25+5:30
यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात बुधवारी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व तयारीबाबत समन्वय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, वर्धाचे शैलेश नवाल, भंडाराचे शंतनू गोयल, गोंदियाच्या डॉ. कादंबरी बलकवडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, मनपा आयुक्त नागपूरचे वीरेंद्र्र सिंह, मनपा आयुक्त चंद्रपूर संजय काकडे, विशेष पोलीस शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, वायुसेनेचे एम. के. सिन्हा, सुजीत भोसले, कामठीचे कर्नल सी. के. राजेश, प्रादेशिक हवामान केंद्र्राचे संचालक ए. डी. ताथे, जे. आर. प्रसाद, सीताबर्डी किल्ला ११८ बटालियनचे सुभेदार वीरेंद्र्रसिंह शेखावत, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एस. डी. धुमाळ,मुख्य वनसंरक्षक संजीव गौर, मुख्य कार्यपालन अधिकारी, मनपा अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, तहसिलदार रवींद्र माने, विभागीय नियंत्रण कक्षाचे नितेश बंभोरे, जयंत डोंगरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवा
सर्व जिल्ह्यांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्यायावत असावे. धोकाप्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होवून जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवावी. जेणेकरून मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नाही. पूरप्रवण परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी त्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा अद्यायावत असावी. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्व स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
प्रत्येक जिल्ह्यात ‘हेलिपॅड’ तयार ठेवा
नागपूर मेट्रोच्या कामामुळे अतिवृष्टीच्या काळात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, यासाठी नागपूर महानगरपालिकेने पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवावी. आपापल्या जिल्ह्यातील हेलिपॅड तयार ठेवावेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने मॉकड्रीलच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक बचाव कार्याचे धडे देऊन त्यांची टीम बचाव कार्यासाठी तयार ठेवावी. यावेळी वायुसेनाचे एम. के. सिन्हा यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुर्गम भागात तातडीने मदत पोहचविण्यासाठी हेलिपॅडची जागा निश्चित असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास शाळेचे पटांगण यासारख्या तत्सम जागेची निवड करून ठेवण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
जनजागृतीवर भर द्या
पावसाळ्यामध्ये वीज कोसळून घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी या कालावधीत मुख्यत्वे शेतात असतात. यामुळे विजेपासून संरक्षण कसे करावे, यासाठी जनतेमध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून स्वयंसेवक, एनजीओ, वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आदींची मदत घ्यावी. येत्या पावसाळी अधिवेशन काळात विविध आंदोलने व मोर्चांच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठीची अतिदक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अनुप कुमार यांनी यावेळी केले.