नागपुरात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोविड केअर सेंटर’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:25 AM2020-05-12T00:25:29+5:302020-05-12T00:28:52+5:30

‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात कोरोना रुग्णाची संख्या ३०० वर गेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्म नियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहेत. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे सुसज्ज‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे.

Equipped with a capacity of five thousand beds Covid hospital in Nagpur | नागपुरात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोविड केअर सेंटर’ सज्ज

नागपुरात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोविड केअर सेंटर’ सज्ज

Next
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना व निर्मिती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात कोरोना रुग्णाची संख्या ३०० वर गेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्म नियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहेत. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे सुसज्ज‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे.
अशा प्रकारचे मोठ्या क्षमतेचे व अल्प कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोविड केअर सेंटर’ ठरू शकते. येथे ५०० बेड तयार करण्यात आले आहेत. दोन-तीन दिवसात २५०० बेड तयार केले जातील. ही संकल्पनाच मुळात तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे.
कारण नागपुरात जी-जी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठविण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी स्वीकारल्याने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर उपचार करता यावे, या दृष्टीने ही तयारी करण्यात आली आहे. मुंढे यांच्या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासाने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटिंग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

शासन निर्देशांनुसार निर्मिती
केंद्र आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच हे सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली. ‘कोविड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार पुढे वाढविण्यात येणार आहे.

महिला व पुरुषासाठी स्वतंत्र व्यवस्था
महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आला आहे.
 

भविष्यात सेंटरची गरज पडू नये : आयुक्त तुकाराम मुंढे
यासंदर्भात बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयींनी युक्त आहे. आवश्यकतेनुसार येथील बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. त्या दृष्टीनेच ‘कोव्हिड केअर सेंटर’ची आखणी आणि निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या निर्मितीसाठी राधास्वामी सत्संग न्यास संस्थेचे सहकार्य लाभले. मात्र ‘सेंटरची भविष्यात गरज पडू नये, असेच आपले मत आहे. नागपुरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Web Title: Equipped with a capacity of five thousand beds Covid hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.