ऐतिहासिक वाफेच्या इंजिनची दुरवस्था
By admin | Published: August 26, 2015 03:09 AM2015-08-26T03:09:16+5:302015-08-26T03:09:16+5:30
समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासिक नॅरोगेज वाफेच्या इंजिनला अवकळा प्राप्त झाली आहे.
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : समारंभपूर्वक केली होती स्थापना
नागपूर : समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासिक नॅरोगेज वाफेच्या इंजिनला अवकळा प्राप्त झाली आहे. या इंजिनखालील जागा भिकाऱ्यांची आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाली असून उखडलेली फरशी, कचरा अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या इंजिनच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे.
आधुनिक काळात सर्वच रेल्वेगाड्या विजेवर धावत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या कोळशावर, डिझेलवर धावतात. त्यामुळे पुरातन काळात रेल्वेचे इंजिन वाफेच्या शक्तीवर धावत होते, ही बाबही आधुनिक पिढीला काही दिवसांनी पटणार नाही. त्यामुळे वर्धा ते आर्वी मार्गावर धावलेल्या एका वाफेच्या इंजिनची डागडुजी करून हे ऐतिहासिक इंजिन प्रवाशांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्त्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी समारंभपूर्वक नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात या वाफेच्या इंजिनची स्थापना केली होती. या इंजिनला बुलंद असे नावही देण्यात आले. परंतु काही दिवसानंतर या इंजिनला अवकळा प्राप्त झाली. इंजिनच्या सभोवताल लावलेल्या साखळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. इंजिनखालील फरशी निघाली आहे. या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. इंजिनखाली बसून असामाजिक तत्त्व उघड्यावर दारू पितात तर रात्रीच्या वेळी भिकारी या इंजिनखाली झोपतात. तेथेच घाणही पसरवितात. त्यामुळे ज्या उद्देशाने हे इंजिन येथे स्थापन करण्यात आले, त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. (प्रतिनिधी)
लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊ
वाफेच्या इंजिनाला अवकळा प्राप्त झाल्याची बाब मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ ओ.पी. सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली असता, याबाबत लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊन या इंजिनखाली असामाजिक तत्त्वांचा वावर बंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.