अवकाळी पाऊस व गारपिट : नागपूर जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 08:45 PM2020-01-03T20:45:30+5:302020-01-03T20:47:44+5:30
मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. येत्या १० दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.
३१ डिसेंबर, आणि १ व २ जानेवारी या दिवशी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह गारपीटही झाली. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर , हरभरा, गहू या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व लोकप्रनिधींनुसार जवळपास ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील जवळपास १३ हजार हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संत्रा व मोसंबीचे ४ हजार हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे.तर ३ हजार हेक्टरवरील तुरीचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळमेश्वर, काटोल, सावनेर, रामटेक, नागपूर ग्रामीणचा काही भाग अशा ५ तालुक्यातील ११६ गावांना या गारपिटीचा फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगितले जाते. सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. येत्यादहा दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.
सर्वेक्षणाचे काम सुरु
गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदजानुसार २२ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ह अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे काम आजपासून सुरु झाले आहे.
रवींद्र ठाकरे
जिल्हाधिकारी नागपूर