टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:25 PM2018-04-18T23:25:29+5:302018-04-18T23:25:39+5:30
एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला आहे. मंगला चव्हाण असे ग्राहकाचे नाव असून, त्या रेशीमबाग येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई, वडील व भावाचे टपाल विभागात संयुक्त खाते होते. या तिघांच्याही मृत्यूनंतर चव्हाण यांनी टपाल विभागाकडे खात्यातील रकमेची मागणी केली. यासाठी त्यांना वारसान प्रमाणपत्र मागण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र मिळवून टपाल विभागात सादर केले. त्यानंतर त्यांना विनाकारण २०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मागण्यात आला. यासह अन्य सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना खात्यातील रक्कम देण्यात आली नाही. परिणामी त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने त्यांना दिलासा दिला. प्रकरणातील तथ्ये पडताळल्यानंतर मंचला टपाल विभागाच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या.
रक्कम परत करण्याचा आदेश
ग्राहक चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातील १ लाख ९ हजार १८९.४५ रुपये परत करण्यात यावेत, असा आदेश मंचने टपाल विभागाला दिला आहे. त्या रकमेवर २७ नोव्हेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत ७ टक्के व्याज देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, चव्हाण यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.