अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे छत्तीसगडवरून पलायन
By admin | Published: July 24, 2016 02:09 AM2016-07-24T02:09:37+5:302016-07-24T02:09:37+5:30
एकमेकांवर प्रेम करताना अचानक घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन युवक-युवतीने घर सोडून पलायन केले.
नागपूर रेल्वेस्थानकावर आढळले : ‘आरपीएफ’ने केले चाईल्ड लाईनच्या स्वाधीन
नागपूर : एकमेकांवर प्रेम करताना अचानक घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन युवक-युवतीने घर सोडून पलायन केले. दुपारी २ वाजता ते नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर संशयास्पदरीत्या आढळल्याने रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना ठाण्यात आणून त्यांना बाल सुधारगृहात रवाना केले.
छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील भुरी तालुक्यातील युवक कौस्तुभ आणि युवती रिना (बदललेले नाव) हे एकमेकांवर प्रेम करीत होते. परंतु त्यांचे प्रेमप्रकरण त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या प्रेमाला विरोध झाला. काही झाले तरी घरच्यांचे न ऐकता एकमेकांसोबत राहायचे असे ठरवून त्यांनी आपापले घर सोडले. तेथून त्यांनी थेट नागपूर रेल्वेस्थानक गाठले. शनिवारी दुपारी २ वाजता ते प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर मुंबई एण्डकडील भागात ते संशयास्पद स्थितीत आढळले. ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान बी. एस. यादव आणि चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधी प्रीती चांदेकर यांना त्यांच्यावर शंका आली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव सांगून घरून निघून आल्याची माहिती दिली. लगेच त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे उपनिरीक्षक कृष्णा राय यांनी त्यांची चौकशी करून त्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले.(प्रतिनिधी)