अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव
By सुमेध वाघमार | Published: June 3, 2024 05:47 PM2024-06-03T17:47:26+5:302024-06-03T17:48:28+5:30
डॉक्टरांना यश : बॉन्कोस्कोपीद्वारे स्टेन्टिंगची प्रकिया केली यशस्वी
नागपूर: श्वसनमार्गामध्ये छिद्र आणि अन्ननलिकेमधील वाढत्या कर्करोगामुळे श्वसनमार्गावर पडणारा दबाव अशा जीवघेण्या परिस्थितीशी झगडत असणाºया एका वृद्ध रुग्णावर ‘बॉन्कोस्कोपी’द्वारे ‘स्टेन्टिंग’ची प्रकिया यशस्वीरीत्या पार पडली. परिणामी रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
फुफ्फुसाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मध्यप्रदेशमधून ६९ वर्षीय रुग्ण नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले. रुग्णाला ‘सीओपीडी’ आणि दीर्घकालीन दम्याचा त्रास असल्याचे निदान झाले. पूर्वी झालेल्या संक्रमित आजारामुळे फुफ्फुसात बºयाच प्रमाणात पाणी जमा झाले होते. यासह रुग्णाला अन्ननलिकेचा दुर्धर कर्करोग झाला होता. ज्यासाठी यापूर्वीच रुग्णाच्या अन्ननलिकेमध्ये स्टेन्टिंग देखील करण्यात आले होते. परंतु, कर्करोगाचे अन्ननलिकेमधील संक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते कि त्याच्या श्वसनमार्गावर दबाव पडत होता. परिणामी, श्वसनमार्गामध्ये छिद्र पडले होते. यामुळे रुग्णाला श्वास घेणे कठीण जात होते. तातडीने उचपार न केल्यास जीवास धोका होता.
छिद्र झाकताच श्वासोच्छवासात फरक
अशा गुंतागुंत परिस्थितीत वरिष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्यासह श्वसनरोग तज्ञ डॉ. परिमल देशपांडे आणि डॉ. स्वप्नील बाकमवार यांनी श्वसनमार्ग स्वच्छ करून मोकळा केला. स्टेन्टिंग प्रक्रियेद्वारे छिद्र झाकून टाकण्याचा मार्ग निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक नियोजनाद्वारे ही प्रकिया यशस्वीरीत्या पार पाडली. ज्यामुळे रुग्णाच्या श्वासोच्छवासात लक्षणीय फरक पडला. रुग्णाचा श्वासोच्छवास पूर्ववत झाल्यावर त्याच दिवशी सुटी देण्यात आली. या प्रक्रियेत चिरा मारण्यात येत नाही.
परिणामकारक उपचार प्रक्रिया
डॉ. अरबट म्हणाले, श्वसनमार्गाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या, श्वसनमार्गामध्ये छिद्र असलेल्या रुग्णांकरिता ब्रोन्कोस्कोपी आणि स्टेन्टिंग ही अत्यंत परिणामकारक उपचार प्रक्रिया आहे. आजवर मध्यभारतातील अनेक रुग्णांच्या श्वासाचे पुनर्वसन करण्यात ही प्रक्रिया यशस्वी ठरली आहे.