केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:16 PM2018-08-23T22:16:13+5:302018-08-23T22:17:29+5:30
केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.
रविभवन परिसरातून केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विशेषत: महिलांसाठी आवश्यक असलेले साहित्य, कपडे, मच्छरदाणी व मुलांसाठी अत्यावश्यक मदत येथील डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष दीपक जैन व व्यवस्थापकीय संचालक गिरीश जैन यांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. यासाठी गिट्टीखदान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नागपूर येथून विविध मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पाठविताना दीपक जैन व गिरीश जैन यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत पाठणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केरळसाठी रवाना केले.
मर्चन्डाईज व्हैन्च्युरीअस प्रा. लि. च्या माध्यमातून ही मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, महिलांसाठी आवश्यक असलेले कपडे, सॅनिटरी पॅड, ओडोमॉस क्रीम, लहान मुलांना आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच कपडे, मच्छरदाणी, साबण तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ असलेला ट्रक गुरुवारी रवाना करण्यात आला. केरळमध्ये आलेल्या या भीषण संकटकाळामध्ये लाखो नागरिक बेघर झाले आहे. सध्या विविध निवारा शिबिरामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सामाजिक दायित्व समजून केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी अविनाश बडगे, नितीन श्रावगी, आदित्य आसोपा आदी उपस्थित होते.