लोकल ‘स्पोटर््स अकादमी’ स्थापन करा
By admin | Published: October 27, 2015 03:43 AM2015-10-27T03:43:31+5:302015-10-27T03:43:31+5:30
विविध स्तरातील खेळाडूंना विशेषत: आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि)
नागपूर : विविध स्तरातील खेळाडूंना विशेषत: आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) लोकल स्तरावर स्पोर्ट्स अकादमी स्थापन करावी, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा, कोळसा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.
वेकोलितर्फे ‘प्रवाह-पायोनिअरिंग द चेंज’ या कार्यक्रमाचे आयोजन वेकोलिलगतच्या विहार कॉलनी येथील सांस्कृतिक भवनात सोमवारी करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोयल बोलत होते. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सहसचिव एस.के. साही आणि वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यावेळी उपस्थित होते.
गोयल म्हणाले, सृष्टी शर्माने देशविदेशात चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी तिला कोल इंडिया आणि वेकोलि सर्वतोपरी मदत करेल. प्रत्येक गावात मुख्यत्वे आदिवासी क्षेत्रात टॅलेंट आहे. बहुतांश अवॉर्ड दक्षिण अफ्रिकन घेऊन जातात. कारण त्यासाठी नैसर्गिक स्थिती अनुकूल असते. अशा स्तराचे प्रशिक्षण युवकांना गावातच मिळावे, यासाठी स्थानिक स्तरावर स्पोर्ट्स अकादमी सुरू करावी. या अकादमीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतील आणि निश्चितच सुवर्ण पदक मिळवितील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
सृष्टीला २.१० लाखांचा धनादेश
या समारंभात सृष्टी धर्मेंद्र शर्माचा पीयूष गोयल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २.१० लाखांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नेतृत्वगुण व दूरदृष्टी महत्त्वाची
४गोयल म्हणाले, कंपनी सरकारी असो वा खासगी हे महत्त्वाचे नाही, पण तिथे काम करणाऱ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि दूरदृष्टी असावी, हे महत्त्वाचे आहे. हेच गुण ‘प्रवाह’ उपक्रमात जुळलेले युवक-युवती तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वेकोलिचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
सृष्टीला ‘लोकमत’चे बळ
सृष्टी शर्मा हिच्यातील प्रतिभा ओळखून तिची राष्ट्रीय स्तरावर ओळख करून देण्याचा विडा ‘लोकमत’ने उचलला होता. २३ आॅगस्ट २०१४ रोजी हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सृष्टीने नागरिकांसमोर लोएस्ट लिंबो स्केटिंग ‘ओवर १० मीटर्स’चे यशस्वी प्रदर्शन केले. तिचे हे प्रदर्शन लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्यात आले होते. अखेर २०१५ च्या सुरुवातीला सृष्टीच्या नावाने ‘लोएस्ट लिंबो स्केटिंग १६.५ सेंटीमीटर हाईट ओवर १० मीटर्स’च्या रेकॉर्डची नोंद झाली. सृष्टीने पुन्हा लोकमतच्या सहकार्याने यावर्षी ७ आॅक्टोबरला वर्धमाननगर येथील सेंटर पॉर्इंट शाळेत लोएस्ट लिंबो स्केटिंग ‘ओवर २५ मीटर्स’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. त्यावेळी वेकोलिचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सृष्टीची वेकोलिचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली होती आणि आर्थिक सहकार्याचे आश्वासन दिले होते.