राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार
By admin | Published: January 3, 2016 03:35 AM2016-01-03T03:35:59+5:302016-01-03T03:35:59+5:30
संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, ....
मुख्यमंत्र्यांची घोषणा : शालेय शिक्षणात संस्कृत समावेशासाठी लवकरच धोरण
नागपूर : संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या भारतरत्नमंजरी या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श.देवपुजारी, प्रांत मंत्री संजय लाभे, महानगर अध्यक्ष मधुसूदन पेन्ना व विजय पल्लेवार आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्व विभागात संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शालेय शिक्षणात संकृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. संस्कृतमध्ये अनेक विषयाचे ज्ञान दडलेले आहे. परंतु ही भाषा आत्मसात न केल्याने अनेक विषयांच्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलो. ही भाषा विद्वानापुरती मर्यादित राहिल्याने त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले.
पल्लेवार लिखित भारतरत्नमंजरी या काव्यपुस्तिकेतील सुंदर रचना इंग्रजी व हिंदीत आहे. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचण्यात आलेली सुंदर रचना वाचून यापेक्षा दुसरे पुष्प त्यांना कोणीच वाहिलेले नसेल. एवढे वास्तव वर्णन यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती. यात १ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होेते. अशी माहिती त्यांनी दिली.भाषांना राजाश्रय व लोकांश्रय प्राप्त झाला तरच त्या टिकून राहतात. संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीकडून होत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. संस्कृत विद्यापीठ या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उषा वैद्य म्हणाल्या.
संस्कृत केवळ प्राचीन गं्रथात अडकून न राहता नव्या योजना आखून त्यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाला पल्लेवार कुटुंबीयाकडून १ लाखाचा निधी देण्यात आला आहे. विद्यापीठ कक्षाला पल्लेवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताविक श्री.श.देवपुजारी यांनी संस्कृत भाषा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात सहाव्या वर्षापासून अनिवार्य करण्यात यावी.
संस्कृतच्या पाठ्यक्रमाची पुनर्रचना, व गुरुकुलांना शासनाने अनुदान देण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. संस्कृत भाषेच्या शलाका परीक्षेत व्दितीय आल्याबद्धल सार्थक घोरपडे या विद्यार्थ्यासह लीना रस्तोगी, चंद्रगुप्त कर्णेकर, संपदा म्हाळगी व आभा भिमनवार आदंीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौररव करण्यात आला. संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी तर आभार छाया भास्करराव यांनी मानले. रजनी दुद्दलवार व उषा गेडाम यांचीही भाषणे झाली. मधुसूदन पेन्ना यांनी पल्लेवार यांच्या काव्यपुस्तिकेचे विवेचन केले. (प्रतिनिधी)