आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:51 PM2017-12-14T19:51:02+5:302017-12-14T20:07:32+5:30
आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चात राज्यभरातून आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते. मोर्चाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट देऊन कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
राज्यातील १५ लाख आॅटोरिक्षा चालक सुमारे ११०० कोटी रुपये खासगी विमा कंपन्यांना देतात. परंतु आॅटोचालकाला विम्यातून १०
हजार रुपयांचा परतावा मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाकडे विमा उतरविण्याचा परवाना आहे. यामुळे जर आॅटोरिक्षा चालकाचा विमा राज्य सरकारने आपल्या परवानाअंतर्गत उतरविला तर राज्य सरकारला फायदा मिळेल, सोबतच कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केला. मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला जाणार नाही, परिवहन मंत्र्यांनी मोर्चात यावे, ही अट मोर्चेकरांनी ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चाला भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारताच तणाव निवळला. या मोर्चात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन, टायगर आॅटोरिक्षा संघटना, आझाद हिंद आॅटो सेना, राष्ट्रवादी आॅटो युनियन व जिल्हा ग्रामीण आॅटोरिक्षा संघटनांचा सहभाग होता. या मोर्चाला आ. कपिल पाटील, आ. जयदेव गायकवाड व आ. प्रतापसिंग पाटील चिखलीकर आदींनी भेटी दिल्या.
अवैध वाहतुकीवर कारवाई
मोर्चाला सामोरे जाताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महांमडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेतली जाईल. जानेवारी महिन्यापासून अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती राबविली जाईल तर ओला, उबेर यासारख्या कॅब कंपन्यांवर बंधने घातली जातील, असे आश्वासन यावेळी रावते यांनी दिले.
अवैध प्रवासी वाहतूक बंद करा,ओला-उबेर कंपन्यांवर कारवाई करा, ई-रिक्षा बंद करा, बोगस परमिटधारकांवर व वाहनांवर कारवाई करा, विमा व शुल्कात झालेली वाढ कमी करा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या . मोर्चाचे नेतृत्व शशांक राव, विलास भालेकर, बाबा कांबळे यांनी केले.