काटोल येथे मोहल्ला जनजागृती दलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:41+5:302021-04-02T04:09:41+5:30
काटाेल : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यातच काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
काटाेल : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यातच काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून जनजागृती करण्यासाठी काटाेल शहरात माेहल्ला जनजागृती दलाची स्थापना करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार तथा नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजय चरडे यांनी दिली.
शासनाच्या आदेशान्वये ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला काेराेना लस दिली जाणार आहे. काेराेनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता उपाययाेजना करण्यासाठी बुधवारी (दि. ३१) काटाेल शहरातील नगर पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले. काेराेना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यासाठी शहरात माेहल्ला जनजागृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. काटाेल हे काेराेनामुक्त शहर करण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीला प्रभारी मुख्याधिकारी तथ तहसीलदार अजय चरडे, नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, पालिकेचे उपाध्यक्ष सुभाष कोठे, सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर व सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगर पालिकेचे अभियंता, सर्व कर्मचारी तसेच नगर परिषदेच्या सर्व शाळांच्या शिक्षकांना काटोल शहरातील प्रत्येक घरी प्रत्यक्ष जाऊन ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांमध्ये काेराेना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या तसेच त्यांना आगामी १० दिवसांच्या आत लसीकरण करून घेण्यास प्रवृत्त करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या. या जनजागृतीसाठी मोहल्ला जनजागृती दलाची स्थापना करण्यात आली. ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोराेना लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.