रेल्वे सुरक्षा दलाचा स्थापना दिन उत्साहात
By admin | Published: September 3, 2015 02:55 AM2015-09-03T02:55:45+5:302015-09-03T02:55:45+5:30
रेल्वे सुरक्षा दलाचा ५९ वा स्थापन दिन समारंभ अजनी येथील परेड मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला.
महिलांनी केले परेडचे नेतृत्व : ओ. पी. सिंह यांनी केले परेडचे निरीक्षण
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाचा ५९ वा स्थापन दिन समारंभ अजनी येथील परेड मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांना परेडच्या वतीने सलामी देण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी भव्य परेडचे आयोजन केले. महिला सशक्तीकरणाचे ध्येय पुढे ठेवून परेडच्या चार प्लाटूनचे नेतृत्व रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला आरक्षक प्रिस्मा शर्मा, किरण नगराळे, अश्विनी मुलतकर, स्वाती शिंदे-थोरात, ज्योतिबाला भौतेकर, श्वान पथक प्लाटूनचे नेतृत्व भूमिका बिसेन यांनी केले. यावेळी बोलताना ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी आरपीएफ जवानांनी अधिक जबाबदारीने कार्य करून नागपूर विभागाचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले. पुरस्कार मिळालेल्या जवान आणि अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. परेड दरम्यान श्वानपथकाच्या विविध चित्तथरारक कवायती सादर करण्यात आल्या. परेडनंतर आयोजित रक्तदान शिबिरात ४१ रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवानांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर, अजनी ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक, आरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन बैतुल ठाण्याचे निरीक्षक चंदन सिंग बिस्ट यांनी केले. आभार सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी यांनी मानले. (प्रतिनिधी)