चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 07:06 PM2018-01-29T19:06:57+5:302018-01-29T19:09:06+5:30
देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
सोमवारी त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगाच्या उत्पत्तीपासून ते मानवाच्या विकासापर्यंत आणि देशातील सध्याच्या परिस्थितीपर्यंत रोखठोक मते व्यक्त केली. यावेळी अमिताभ पावडे, नागेश चौधरी, डॉ. पी.एस. चंगोले उपस्थित होते.
कसबे म्हणाले, चातुर्वर्ण्य व्यवस्था व महिलांच्या दास्यतेमुळेच या देशाचा इतिहास पराभवाचा, गुलामगिरीचा राहिलेला आहे. भारतावर अनेक राजांनी आक्रमण केले. राज्य केले. त्याचे कारण म्हणजे ही चातुर्वर्ण्यव्यवस्थाच आहे. कुणीही राज्य करावे, परंतु त्यांनी आमच्या या व्यवस्थेला धक्का लावू नये, असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज आले, तेव्हा त्यांनीही चातुर्वर्ण्यव्यवस्थेला धक्का लावू नये, अशीच अपेक्षा होती. परंतु इंग्रज हे आधुनिक विचारसरणीतून आलेले होते. त्यांना ही व्यवस्था मान्य नव्हती. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. महात्मा गांधीजींच्या रूपात एक नवीन विचारांचा सर्वांना घेऊन जाणारा नेता उदयास आला. तेव्हा आता आपली व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने आरएसएसची स्थापना झाली. म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्याशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पुढे देश स्वतंत्र झाला आणि संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणूनच आरएसएसला हे संविधान मान्य नाही. संविधान कसे कमकुवत होईल आणि पुन्हा चातुवर्ण्यव्यवस्था निर्माण करता येईल, यासाठीच ते काम करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. बबन नाखले यांनी केले. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. तर संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.
देशात अराजक वातावरण
संविधानाच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही, तर एक दिवस लोक संविधान नष्ट करून फॅसिझम आणतील, अशी भीती संविधाननिर्मात्यांनी तेव्हाच वर्तविली होती. तशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम आरएसएस करीत आहे. त्यामुळे देशात अराजक वातावरण निर्माण झाले आहे. देशाला वाचवायचे असेल तर शेतक ऱ्यांना केंद्र स्थानी माणून धोरण ठरवण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची गरज आहे, असेही रावसाहेब कसबे म्हणाले.