चंद्रपुरातील वाढत्या वाघांच्या स्थानांतरणासाठी अभ्यास समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:47 AM2020-10-08T11:47:40+5:302020-10-08T11:48:00+5:30
tigers Nagpur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढलेले वाघ व त्यामुळे सततनिर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रकारानंतर आता राज्य सरकारने येथील वाघांच्या स्थानांतरणासाठी हालचाल सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढलेले वाघ व त्यामुळे सततनिर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रकारानंतर आता राज्य सरकारने येथील वाघांच्या स्थानांतरणासाठी हालचाल सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संदभार्त सखोल अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट समिती गठीत करण्याची घोषणा वनमंत्री संजय राठोड यांनी केली आहे.
ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला होता. येथे वाघांची संख्या वाढत असल्याने मानव व वाघ संघर्षात वाढ होत असल्याची बाब बैठकीमध्ये चर्चेला आली होती. तेव्हापासून हा विषय राज्य सरकारच्या विचाराधीन होता. यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. वाघांचे योग्य अधिवासात संवर्धन व स्थानांतरणाबाबत विविध पर्याय तपासून हा अभ्यास गट ३१ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.