आता आंबा पिकविण्यासाठी होणार ‘इथेलीन स्प्रे’चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 07:00 AM2022-04-06T07:00:00+5:302022-04-06T07:00:06+5:30
Nagpur News आंबा पिकवण्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या कार्बाईडच्या वापरावर बंदी आल्याने व्यावसायिक इथेलीन स्प्रेचा वापर करणार आहेत.
सुमेध वाघमारे
नागपूर : आंबा व इतर फळे पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’च्या वापरावर बंदी आहे. त्याऐवजी इथेलीन गॅसचा पर्याय सुचविण्यात आला आहे. यासाठी काही आंबा व्यावसायिकांनी ‘रायपिंग चेंबर’चा वापर सुरू केला असला तरी आंब्याची आवक व या ‘चेंबर’ची संख्या याचे गणित जुळत नाही. त्यामुळे काही व्यापारी ‘इथेलीन स्प्रे’चा तर काही अजूनही ‘कार्बाईड’चा वापर करीत असल्याचे वास्तव आहे. परिणामी, आंबा खातांना काळजी घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात. परंतु यात मोठा वेळ जात असल्याने, फळे नष्ट होण्याची भीती असल्याने व वाहतुकीसाठी ती योग्य राहत नसल्याने फळे कच्च्या अवस्थेत तोडून कृत्रिमरीत्या पिकविण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यानच्या काळात ‘कॅल्शियम कार्बाईड’चा वापर करूनच फळे पिकविल्या जात होते. मात्र हे आरोग्याला घातक असल्याने व कॅन्सरसारखा आजाराचा धोका वाढत असल्याने अन्न सुरक्षा आणि मानक नियमावलीनुसार ‘कार्बाईड वायू’ किंवा ‘ॲसिटिलीन वायू’चा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. यावर ‘इथेलीन गॅस’चा पर्याय सुचविण्यात आला. परंतु फळांचे मोठे व्यापारी वगळता अनेक लहान व्यापाऱ्यांकडे आंबा पिकविण्यासाठी ‘रायपिंग चेंबर’ची सोय नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात ‘इथेलीन स्प्रे’चा वापर वाढला आहे.
- कार्बाईडला बंदी का?
‘कॅल्शियम कार्बाईड’मध्ये ‘आर्सेनिक’ व ‘फॉस्फरस’चे अंश असतात. जे आरोग्यासाठी हानीकारक असतात. याच्यामुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा येणे, गिळण्यात त्रास होणे, उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे आदी लक्षणे दिसून येतात. यामुळेच या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे.
-‘इथेलीन’ बाटलीवर ‘डेंजर’ चिन्ह
आंबा पिकविण्यासाठी वापरला जाणारा ‘स्प्रे’ विविध कंपन्यांनी बाजारात आणले आहेत. त्यावर इथेलीनचे प्रमाण ३९ टक्के असल्याचे छापील आहे. मात्र, त्यात रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाटलीवर ‘डेंजर’चे चिन्हही आहे. काही बाटलीवर आंबा पिकविण्यासाठी तर काहींवर झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असे लिहिले आहे.
-इथेलीन वायू वापरण्यामागील कारण
‘एफडीए’नुसार इथेलीन वायूचा वापर केल्यास फळामध्ये नैसर्गिकरीत्या हार्माेन तयार होतात. या हार्माेनमुळे फळ पिकविण्याचे नियमन करते. नैसर्गिक पिकण्यास चालना देते. यातही इथेलीन वायूचा वापर १०० ‘पीपीएम’पेक्षा अधिक नको, अशा सूचनाही केल्या आहेत.
- ३० ते ४० टक्के आंब्यावर ‘इथेलीन स्प्रे’चा वापर
एका फळ व्यापाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, आंबा पिकविण्यासाठी ‘रायपिंग चेंबर’ हा एक चांगला पर्याय आहे. मात्र हंगामात येणारा सर्व आंबा पिकविला जाईल इतके चेंबर उपलब्धही नाहीत. यामुळे ३० ते ४० टक्के आंबा हा ‘इथेलीन स्प्रे’ने पिकविला जातो,
- सहा वर्षात दूषित ३५ हजार किलो आंबे जप्त
‘एफडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या सहा वर्षात आंब्याचे ३४ नमुने दूषित आढळून आले. ३५ हजार ३९७ किलो आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले.
- आंबे पिकविण्यासाठी ‘इथेलीन गॅस’हाच पर्याय
आंबे पिकविण्यासाठी ‘इथेलीन गॅस’हाच पर्याय आहे. इतर रसायनाचा वापर होत असल्यास कारवाई केली जाईल. ‘इथेलीन स्प्रे’बाबत माहिती नाही.
- नितीन मोहिते, सहायक आयुक्त (अन्न)