युरोपियन ‘बार हेडेड गुज’ पक्षी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:19 PM2018-12-11T21:19:14+5:302018-12-11T23:53:01+5:30
थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड मार्गावरील पारडगाव व खापरी तलावावर युरोप येथून ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचा थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून नागपुरात दाखल झाले आहेत. या पक्ष्यांसोबतच ब्लॅक नेक स्टॉर्क (काळ्या मानाचा करकोचा), ‘ग्रे-लॅग गूज’, ‘रेड क्रेटेड पोचाड’ सारखे स्थलांतरित पक्षीही दिसून येऊ लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड मार्गावरील पारडगाव व खापरी तलावावर युरोप येथून ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचा थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून नागपुरात दाखल झाले आहेत. या पक्ष्यांसोबतच ब्लॅक नेक स्टॉर्क (काळ्या मानाचा करकोचा), ‘ग्रे-लॅग गूज’, ‘रेड क्रेटेड पोचाड’ सारखे स्थलांतरित पक्षीही दिसून येऊ लागले आहेत.
मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप, कजाकस्थान आदी उत्तरीय ध्रृवाकडील देशामध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. यामुळे खाद्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. यात भारतात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. पारडगाव तलावाच्या परिसरात मागील वर्षी जानेवारी महिन्यात ‘बार हेडेड गुज’ मोठ्या संख्येत आढळून आल होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या पक्ष्याच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या स्थितीत सुमारे शंभराच्यावर पक्ष्यांचा थवा दिसून येत आहे. यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता नागपूर पक्षी मित्र वर्तवित आहे. ‘बार हेडेड गुज’ या पक्ष्यासोबतच ब्लॅक नेक स्टॉर्क हा युरोपमधून येणारा पक्षीही आढळून आला आहे. सोबतच भारतीय असलेला परंतु दिल्ली येथे आढळून येणारा ‘पिजन्ट टेल्ड जकाना’ हा पक्षीही दिसून आला आहे.
दरवर्षी न चुकता येतात
‘बार हेडेड गुज’ हे पक्षी युरोप येथील विशेषत: मंगोलिया येथून सुमारे ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून नागपुरात येतात. हिमालयाच्या साधारण ३० हजार फूट उंचीवरून ते उडतात. अशा वातावरणात आॅक्सिजनचे प्रमाण फार कमी असते. वाऱ्याचा प्रचंड वेग असतो. असे असतानाही न चुकता दरवर्षी नागपुरात येतात.
‘कॉलर’ टाकलेल्या पक्ष्याची प्रतीक्षा
२००७ मध्ये गळ्यात पिवळ्या रंगाचा ‘कॉलर’ टाकलेला ‘बार हेडेड गुज’ पक्षी दिसून आला होता. या ‘कॉलर’वर ‘एनयू' अशी इंग्रजी अक्षरे काळ्या रंगामध्ये लिहिलेली आहेत. मंगोलियामधील या पक्ष्याची माहिती लागलीच मंगोलिया येथील ‘वाईल्ड लाईफ कंझरव्हेशन सोसायटी’च्या संस्थेचे पक्षीतज्ज्ञ मार्टिन गीलबर्ड यांना देण्यात आली होती. त्यानंतर सतत चार वर्षे हा पक्षी या तलावावर दिसून आला. परंतु २०१२ पासून हा पक्षी आढळून आला नसल्याचे पक्षी मित्र सांगतात.
तलावांवर, जंगलांमध्येही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
विदर्भातील विविध जलाशयांवर तसेच जंगलांमध्ये विविध जातीच्या हजारो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यामध्ये ‘युक्रेन’, ‘सायबेरीया’, ‘झेकोस्लाव्हाकिया’ येथून स्थलांतर करून येणारे दुर्मिळ काळे करकोचे , दुर्मिळ तुर्रेवाला, डाबचीक, ग्रे लॅग गुज, यासह लालसरी, पोचारड, कॉमन पोचारड, तुर्रेवाले बदक, कॉमन टील, ब्राऊनी डक आदी पाणपक्षी तलावांवर दिसून येत असल्याचे पक्षिमित्रांचे म्हणणे आहे. छोट्या पक्ष्यांमध्ये शंकर (ब्ल्यू थ्रोट) युरेशियन रायनेक, बुटेड व्हार्बलर, पिवळा परीद आदी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. विदर्भात आलेल्या विविध स्थलांतरित पक्ष्यांचा पक्षिमित्र व पक्षी निरीक्षक नोंदी घेत आहेत.