युरोपियन पाहुणे नागपूरकरांच्या भेटीला
By admin | Published: February 27, 2017 02:09 AM2017-02-27T02:09:48+5:302017-02-27T02:09:48+5:30
पळसाचे झाड फुलाने बहरत नाही तोच युरोप खंडातून विदेशी पाहुण्यांचे थवे नागपूर भेटीला आले आहेत.
पळस मैनाच्या विहाराने व्यापत आहे आकाश : गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाली शिकार
नागपूर : पळसाचे झाड फुलाने बहरत नाही तोच युरोप खंडातून विदेशी पाहुण्यांचे थवे नागपूर भेटीला आले आहेत. हे पाहुणे आहेत ‘पळस मैना’. समूहाने राहणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याने आसमंत व्यापत आहे. मात्र, हजारो किलोमीटरचे अंतर कापून आलेल्या या पक्ष्यांवर शिकारीची नजर आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्ये या पक्ष्यांची विक्री झाल्याचे पक्षिप्रेमींचे म्हणणे आहे.
या पक्ष्याला मराठीत पळस मैना, तेलगूमध्ये पळीसा तर इंग्रजीत ‘रोजी स्टारलिंग’ असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘स्टर्न्स रेसियस’ आहे. मैनेसारखा दिसणाऱ्या या पक्ष्याचा रंग फिक्कट गुलाबी असतो. गडद केशरी रंगाचे पाय तर पंख, शेपटी, गळा डोके आणि छाती काळ्या चकचकीत रंगाचे असते. चोच पिवळ्या रंगाची असते. पळस मैनेच्या डोक्यावर तुरा दिसतो आहे, हा तुरा नर पक्ष्याच्या डोक्यावर विणीच्या हंगामात दिसतो. शेपटीच्या खाली पायाजवळ काळ्या ठिपक्यांची नक्षी दिसते.
पक्षी अभ्यासकांच्या मते, युरोपमधील स्थलांतरित पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. परंतु हा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होतो. सध्या नागपूरमध्ये आलेले हे पक्षी परतीच्या प्रवासावर आहेत. नागपुरात आठ ते दहा दिवस मुक्काम करून ते निघून जातात. परत दुसरे थवे त्यांची जागा घेतात.
या पक्ष्यांना प्रवासाच्या दरम्यान खाद्य पाहिजे असते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने वजन वाढवून आरामही पाहिजे असतो. यासाठी काही दिवस ते थांबा घेतात. याला ‘फिडिंग अॅण्ड रेस्टिंग स्टॉप’ असेही म्हणतात. हा पक्षी साधारण मे महिन्यापर्यंत आपला पाहुणचार उपभोगतो. चिमण्यांपेक्षा काहीशा मोठ्या आकाराचे हे पक्षी थव्याने आकाशात विहार करतात. एका थव्यात दीड हजार ते दोन हजार पक्षी असतात.(प्रतिनिधी)