इच्छामरणाने मरणासन्न रुग्णांची त्रासातून मुक्तता होईल; डॉक्टर सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:56 AM2018-03-10T10:56:55+5:302018-03-10T10:57:03+5:30
इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेली कित्येक वर्षे इच्छामरणावर देशात चर्चा सुरू होती. अनेकांनी आता आम्हाला जगायचे नाही, औषधोपचार करायचे नाहीत असे म्हणत इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली होती. इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.
निर्णयात नीतीमत्ता राखली गेली पाहिजे
वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रामधील नीतिमत्तेलाही अलीकडे आव्हान दिले जात आहे आणि म्हणून त्या नीतिमत्तेच्या चौकटीत राहूनच यावर योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, अशिक्षित व दुर्लक्षित झालेला रुग्णही अगतिक झाल्यावर इच्छामरणाची मागणी करतो. यामुळे त्याला सर्व प्रकाराचे उपचार मिळाले का आणि मिळूनही तो मरणासन्न अवस्थेत दिवस काढत असेल तर नीतिमत्तेच्या चौकटीत राहून त्या पद्धतीचा निर्णय घ्यायला हरकत नाही.
मरणासन्न रुग्णासाठी योग्य निर्णय
वरिष्ठ मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी म्हणाले, कोमातून निघून एखादा रुग्ण मरणासन्न अवस्थेत गेला असेल किंवा एखाद्या रुग्णावर जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होत नाही आणि तो वेदना सहन करीत दैनंदिन गोष्टींसाठी दुसऱ्यावर निर्भर असेल, त्याचा स्वत:चा शरीरावर ताबा नसेल या दोन्ही प्रकरणात इच्छामरणाचा मार्ग योग्य ठरू शकेल.
निर्णयाचा गैरवापर होऊ नये
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, प्रत्येक डॉक्टरच्या वैद्यकीय सेवेत एक तरी असे प्रकरण येते जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होणार नाही असे डॉक्टरांना समजते. अशा प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधोपचारांचे प्रमाण कमी करतात. पण, फक्त औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून या निर्णयाचा गैरवापर होऊ नये.