मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संथच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:04 AM2017-08-28T01:04:10+5:302017-08-28T01:04:28+5:30
मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे. मूल्यांकनादरम्यान तांत्रिक अडचणींचचा सामना करावा लागत आहे. ज्या कालावधीत लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व्हायला हवे होते, तेथे आतापर्यंत १७ हजार उत्तरपत्रिकादेखील पूर्णपणे तपासून झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. राज्यपालांनी दिलेली ‘डेडलाईन’ निघून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन पूर्ण झालेले नाही. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी महाविद्यालयात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला जागा उपलब्ध करून दिली होती. तेथे वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे. मात्र वारंवार येणाºया तांत्रिक अडथळ्यांमुळे आतापर्यंत मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांनी १७ हजारांचा आकडादेखील गाठलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुरुवातीच्या चर्चेनुसार १० दिवसांतच साधारणत: लाखभर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबई विद्यापीठातील मूल्यांकनाचे ‘सॉफ्टवेअर’ वेगळे आहे. शिवाय संथ ‘सर्व्हर’मुळे उत्तरपत्रिका ‘ट्रान्सफर’ करण्यास वेळ लागतो आहे. महिना उलटून गेल्यानंतरदेखील ही समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे लाखोंऐवजी केवळ १७ हजारांच्या आसपासच उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन होऊ शकले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डॉ. बबन तायवाडे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.