मजनुगिरी करणे महागात पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:15 PM2018-09-08T22:15:11+5:302018-09-08T22:17:53+5:30
मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली. उमरेड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. शहरातील एका शाळेमधील मुली क्रीडा स्पर्धेनंतर शाळेकडे जात होत्या. अशातच आरोपी निखिलने टोमणे मारून अश्लील शिवीगाळ केली. मुलींनी ही बाब शाळेतील मुख्याध्यापिकेला सांगितली. लागलीच शाळेतील शिक्षक आणि काही विद्यार्थिनींनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, पोलीस उपनिरीक्षक आरती उघडे यांना ही गंभीर बाब सांगितली. संपूर्ण बाब ध्यानात येताच आरती उघडे यांनी दखल घेत आरोपीस तडकाफडकी अटक केली. उमरेड पोलीस ठाण्यात २९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात आरती उघडे तपास करीत आहेत.
आवर कोण घालणार?
शाळा परिसर, बसस्थानक, शहरातील मुख्य चौकात सकाळी ११ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काही विशिष्ट घोळक्यांचा जमाव ठिकठिकाणी दिसून येतो. एखादी घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्कता बाळगते. काही दिवसात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून येते. अशाप्रकरच्या घटनांमुळे मुली, तरुणी आणि महिला वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण होत असून वेळीच याला आवर घातल्या गेला नाही तर पुन्हा एखादी मोठी घटना झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.