स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्षीही दंडकारण्य स्वातंत्र्योत्सवापासून अनभिज्ञ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:09 AM2021-08-15T04:09:44+5:302021-08-15T04:09:44+5:30

- नक्षल्यांचे सावट कधी संपणार : भूसुरुंग, बंदुकीच्या गोळ्यांच्या धास्तीत जगतात आदिवासी प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

Even in the 74th year of independence, Dandakaranya is ignorant of the Independence Day celebrations! | स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्षीही दंडकारण्य स्वातंत्र्योत्सवापासून अनभिज्ञ!

स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्षीही दंडकारण्य स्वातंत्र्योत्सवापासून अनभिज्ञ!

Next

- नक्षल्यांचे सावट कधी संपणार : भूसुरुंग, बंदुकीच्या गोळ्यांच्या धास्तीत जगतात आदिवासी

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून भारताचे स्वातंत्र्य आज ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने मातीपासून ते ब्रह्मांडापर्यंत भरारी घेतली आहे. मात्र, श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्यात आजही विकासाची ज्योत प्रज्वलित झालेली नाही. आजही येथील लोक अर्धनग्न अवस्थेत असतात. शिक्षणाचा तर प्रश्नच उरत नाही. महामार्ग मंजूर झालेले आहेत. मात्र, ते केवळ कागदावरच आणि नक्षल्यांचे तांडव येथील आदिम जमात राजरोस अनुभवत असते. स्वातंत्र्य म्हणजे काय हो... असा प्रश्न येथील आदिम मोडक्यातोडक्या मराठीत आपणास विचारत असतात.

दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील दुर्गम भागातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी भामरागड तालुक्यातील ११७ लोकवस्ती असलेल्या बंगाडी या छोट्या गावात प्रवेश केला आणि इतर गोष्टी तर सोडाच ‘स्वातंत्र्यदिन म्हणजे काय’ हा प्रश्न कानी पडला. हा प्रश्न उपस्थित झालेल्या गावात भुसूरुंग, बंदुकीच्या गोळ्या यांचा परिचय आहे आणि त्याची धास्तीही प्रचंड आहे. तेव्हापासून नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतर असलेल्या या गावात शैक्षणिक, वैद्यकीय कामे करण्यासाठी ही मंडळी दर आठवड्याला पोहोचत असतात. याच वर्षी २६ जानेवारीला गणराज्यदिन साजरा करत भारताची अस्मिता असलेला तिरंगा ध्वज फडकावला आणि त्याच वेळी विशेष म्हणजे, नक्षल्यांची भीती मिटविण्यासाठी याच गावात उभारण्यात आलेले नक्षली स्मारक कार्यकर्त्यांनी उद्ध्व‌स्त केले. नक्षल्यांच्या जवाबी कारवाईचा धोका माहीत असतानाही नागपूरचे कार्यकर्ते तेथे देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यााठी पोहोचले आहेत.

रुग्णाला उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करावे लागतात

आदिवासी माडिया या आदिम जमातीतील लोकांचे हे गाव. येथे दीड वर्षापूर्वी वीज पोहोचली. मोबाईल नेटवर्क नाहीच. रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा स्वप्नांच्या गावीच. रुग्णाला उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करून कावड धरून डोंग्याने (नाव) १० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी येथे जावे लागते. प्रकृती जास्तच बिघडली तर लाहेरी येथून १९ किमी अंतरावर असलेल्या भामरागड येथे न्यावे लागते. मात्र, ॲम्ब्युलन्स असते का, हा प्रश्न आहे. भामरागडसाठी सकाळी एकच बस जाते आणि संध्याकाळी परत येते.

नक्षल्यांची भीती दूर करण्यासाठी आम्ही बंगाडीत

भामरागड, लाहेरी, गुंडेनूर, बंगाडी, कुरेनार, बिनागुंडा, कुकामेटा व नंतर छत्तीसगडची सीमा असा हा ३३ किमीचा महामार्ग घोषणा होऊनही बनलेला नाही. कच्चे रस्ते, नक्षल्यांच्या कारवायामुळे येथी आदिम समुदाय दहशतीत असतो. तिरंगा झेंडा लावला तर तो काढला जातो, भारत माता की जय म्हटले तर ठार मारले जाते. अशा स्थितीत जोवर नक्षल्यांची भीती दूर होणार नाही तोवर शैक्षणिक कार्य होणार नाही. ही बाब जाणूनच आम्ही तेथे कार्य सुरू केले आहे.

- दत्ता शिर्के, अध्यक्ष - जनसंघर्ष समिती

....................

Web Title: Even in the 74th year of independence, Dandakaranya is ignorant of the Independence Day celebrations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.