नागपुरात ४० हजार एलईडी लावल्यानंतरही वीज बिल वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 09:32 PM2018-08-27T21:32:52+5:302018-08-27T21:35:28+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आले. परंतु २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात महापालिकेचा पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. खर्चात कपात तर दूरच खर्च वाढल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आले. परंतु २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात महापालिकेचा पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. खर्चात कपात तर दूरच खर्च वाढल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकल्पावर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबांच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर शहरातील मार्गावरील एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पाचे काम संथ आहे. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आलेले आहेत. जवळपास ३०टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांतच वीज बचतीतून प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल असा दावा पदाधिकारी व अधिकाºयांकडून केला जात आहे. मात्र ४० हजार एलईडी लावल्यानंतरही विजेवरील खर्च कमी झालेला नाही.
२०१७-१८ या वर्षात पथदिव्यांच्या वीज बिलावर ३५ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर २०१८-१९ या वर्षात पथदिव्यांच्या वीज बिलावर ३६ कोटी ७४ लाख खर्च करण्यात आले. मार्च ते मे २०१८ या तीन महिन्यात पथदिव्यांच्या वीज बिलावर ८ कोटी ६० लाखांचा खर्च करण्यात आला. ३५ ते ४०हजार एलईडी पथदिवे लावल्यानंतर वीज बिलाच्या खर्चात २५ ते ३० टक्के कपात होणे अपेक्षित होते. परंतु वीज बिलावरील खर्च कमी झालेला नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध नाही
पथदिव्यावरील खर्चात बचत होण्यासाठी जुने पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. एलईडी पथदिवे लावण्याचे काम हाती घेतल्यानंतर पथदिव्यावर होणाºया वीज खर्चात नेमकी किती बचत झाली, याची माहिती लेखा परीक्षणातून समोर आली असती. परंतु महापालिकेच्या प्रकाश विभागाकडे याबाबतचा लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
पथदिव्यावरील वीज खर्च
वर्ष खर्च(कोटी)
२०१६-१७ ३५.५९
२०१७-१८ ३६.७४
२०१८-१९(मार्च ते मे ) ८.६०
नवीन एलईडी दुरुस्तीवर खर्च
कोणतीही नवीन वस्तू विकत घेताना तिचा ‘वॉरंटी’ कालावधी असतो. अर्थातच एलईडी पथदिव्यांनाही अशी वॉरंटी असते. परंतु महापालिका वॉरंटी कालावधीतही या दिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर वर्षाला २२ ते २३ कोटींचा खर्च करीत आहे. महापालिकेच्या प्रकाश विभागातर्फे एलईडी दिव्यामुळे वीज खर्चात बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक दिव्यावर महिन्याला ६२ रुपये, तर जुन्या पथदिव्यांच्या खांबावर ८२ रुपये खर्च होत आहे. एवढेच नव्हेतर यात दरवर्षी १० टक्के वाढ होणार आहे. यामुळे कंत्राटातील अटी व शर्ती कुणाच्या सोयीनुसार निश्चित करण्यात आल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रकरणाची चौकशी व्हावी
पथदिव्यांवरील वीज खर्चात बचत व्हावी, या हेतूने शहरातील १.३०लाख पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. विभागाकडे याचा लेखापरीक्षण अहवालही उपलब्ध नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. हा प्रकल्प संशयास्पद असल्याने याची उच्चस्तरीय अधिकाºयांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केली आहे.