नगरसेवकांच्या तक्रारीनंतरही खड्डा बुजत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:49 AM2018-09-04T00:49:21+5:302018-09-04T00:50:26+5:30
शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजवायचा, अन्य खड्डे जीवघेणे असले तरी त्याची दखलच घ्यायची नाही. प्रशासन इतके मुजोर झाले आहे, की नगरसेवकाने तक्रार केल्यानतंरही खड्डा बुजवला जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजवायचा, अन्य खड्डे जीवघेणे असले तरी त्याची दखलच घ्यायची नाही. प्रशासन इतके मुजोर झाले आहे, की नगरसेवकाने तक्रार केल्यानतंरही खड्डा बुजवला जात नाही.
उत्तर नागपुरातील आटोमोटिव्ह चौकातून इतवारीकडे जाणाऱ्या मार्गावर मागील काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. या भागातील बसपाचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी महापालिका प्रशासन व नासुप्रकडे तक्रार केली आहे. परंतु अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता कुणाच्या मालकीचा आहे. यापेक्षा या रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेणे अपेक्षित होते. परंतु विभागाला अपघाताशी काहीही देणेघेणे नाही.
शहरातील खड्ड्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याकरिता रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यात पुन्हा केबल आॅपरेटर्सही खड्डे खोदत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असताही महापालिकेचे अधिकारी मात्र केवळ लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतरच खड्ड्यांची दखल घेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एप्रिल ते जूनपर्यंत महापालिकेकडे एक हजार नऊ खड्ड्यांची तक्रार प्राप्त झाली. मात्र, त्यापैकी केवळ ७३३ खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली. उर्वरित २६६ खड्डे तसेच राहिले. आॅगस्टपर्यंत ही संख्या जवळपास चार हजारापर्यंत वाढली. महापालिकेने त्यापैकी तीन हजार खड्डे बुजवण्याचा दावा केला आहे.
पावसाळाभर त्रास सोसावा लागणार
खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा हॉटमिक्स प्रकल्प आहे. त्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात येतात. मात्र अद्याप सुरू झालेला नाही. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स प्रकल्प बंद असल्याने चुरी टाकून ते दाबण्यात येतात. परंतु पाऊ स आला की ही चुरी बाहेर पडते व पुन्हा खड्डा पडतो. पावसाळा संपेपर्यंत हा प्रकार सुरू राहणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही.