आता राज्य सरकारलाच नको आहे का जिल्हा रुग्णालय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:52 PM2023-11-27T13:52:01+5:302023-11-27T13:52:48+5:30
आठ वर्षे होऊनही बांधकाम अपूर्णच : जिल्हा रुग्णालयाअभावी आरोग्य कार्यक्रमांची हेळसांड
सुमेध वाघमारे
नागपूर : प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी जिल्हा रुग्णालय असणे आवश्यक असताना नागपूर जिल्हा रुग्णालयाचा २०१२ पर्यंत विचारच झाला नाही. त्यानंतर कधी जागेला घेऊन तर कधी मंजुरीला घेऊन सुरुवातीचे चार वर्षे रखडली. २०१६ मध्ये बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावाने आजही बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. सरकारलाच जिल्हा रुग्णालय नको आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु येथील मनुष्यबळांच्या रिक्त जागेपासून ते सोयी-सुविधांअभावी रुग्णांची हेळसांडच होत असल्याचे दिसून येते. कोरोना काळात या उणिवांची जाणीव सर्वांनाच झाली. यामुळे कोरोनांनंतर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण होऊन रुग्णसेवेत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वांवरच पाणी फेरले आहे.
- प्रशासकीय मंजुरीपासून ते प्रत्यक्ष बांधकाम कासवगतीने
अपुऱ्या आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने २०१२ मध्ये पहिल्यांदा जिल्हा रुग्णालयाचा विचार पुढे आला. १७ जानेवारी २०१३ रोजी नागपुरात १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यावर निर्णय झाला. रुग्णालयाच्या बांधकामाकरिता प्रादेशिक मनोरुग्णालयाची ८.९० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. २०१६ मध्ये २८ कोटी रुपये खर्चून रुग्णालयाचा बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु प्रत्यक्ष बांधकाम ऑक्टोबर २०१८ पासून सुरू झाले. हे बांधकाम दीड वर्षात पूर्ण होणार होते. परंतु शासनाने निधी देण्यास हात आखडता घेतल्याने आठ वर्षांचा कालावधी होऊनही बांधकाम अर्धवट स्थितीत आहे.
- असे राहणार होते रुग्णालय
रुग्णालयाच्या दोन मजलीच्या या इमारतीत तळमजल्यावर ‘ओपीडी’, नेत्ररोगाचा वॉर्ड, ईसीजी कक्ष, प्रयोगशाळा, वैद्यकीय भांडार, फिजिओथेरपी कक्ष, रक्तपेढी, एक्स-रे कक्ष, पाकगृह, पहिल्या माळ्यावर स्त्रीरोग व प्रसूती वॉर्ड, बालरोग वॉर्ड, लेबर रूम, बालचिकित्सा ओपीडी, सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रतीक्षालय, डॉक्टर्स रूम, नर्सिंग स्टेशन, स्त्री सर्जिकल वॉर्ड, रेकॉर्ड रूम, अतिदक्षता विभाग, डेंटल ओपडी, तर दुसऱ्या माळ्यावर कार्यालय व सभागृह प्रस्तावित आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
- जिल्हा रुग्णालयाचे फायदे
- जिल्हा वाढत असल्याने आरोग्याची सोयी उपलब्ध होतील
- रुग्णांना अद्ययावत सेवा मिळेल
- मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी होईल.
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी होईल.
- जिल्हा शल्यचिकित्सकाला स्वत:चे कार्यालय मिळेल.
- विविध प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होतील.