पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतरही वाहन विक्रीत झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:03+5:302021-02-21T04:11:03+5:30
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे, तर दुसरीकडे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीत होणारी वाढ ...
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे, तर दुसरीकडे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीत होणारी वाढ आश्चर्य करणारी आहे. लोकांवर इंधन दरवाढीचा फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही. वाढत्या मागणीसह कंपन्यांकडून पुरवठा कमी आहे. कार, एसयूव्ही आणि दुचाकी वाहनांची डिलिव्हरी डीलर्सला सहजरीत्या करणे कठीण झाले आहे. बाजारपेठांमध्ये वाहनांची विक्री वाढल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
इंधनाच्या वाढत्या किमतीचा परिणाम नाही
वर्ष २०२० मध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस पेट्रोल ८०.८१ रुपये व डिझेल ७०.९१ रुपये लिटर होते. तर आज पेट्रोल ९७.४८ रुपये तर डिझेल ८८.५९ रुपयांवर पोहोचले आहे. अर्थात एक वर्षात पेट्रोल १७ रुपये आणि डिझेल १८ रुपयांनी महाग झाले आहे. त्यानंतरही लोकांचा कल पेट्रोल व डिझेल कारकडे जास्त दिसून येत आहे. यामध्ये मध्यमवर्गीय खरेदीसाठी उत्सुक दिसून येत आहेत. कारप्रेमींवर वाढत्या इंधनाच्या वाढत्या किमतीचा काहीही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षीच्या कोरोना काळानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक बूम आला आहे.
कंपन्यांचा नवीन मॉडेल लाँच करण्याकडे कल
ग्राहकांच्या मागणीमुळे लॉकडाऊननंतर अनेक कंपन्यांनी कारचे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हा क्रम अजूनही सुरू आहे. पूर्वीच्या तुलनेत काही कारचे वेटिंग तीन ते चार महिन्यावर गेले आहे. सर्वच कंपन्यांच्या मॉडेलचे वेटिंग वाढले आहे. काही कारसाठी सहा ते आठ महिने लागत आहेत. एसयूव्ही कारचे वेटिंग वाढले आहे.
डीलर्स म्हणाले, आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोपार्टच्या कमतरतेमुळे चारचाकी आणि दुचाकी कंपन्यांना अडचणी जास्त येत आहेत. वाढती मागणी आणि वेटिंग काळ वाढल्याने कंपन्यांवर ताण आला आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपन्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागत आहे. वेटिंग काळ वाढल्यामुळे डीलर्ससमोर ग्राहक टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिलेल्या तारखेत वाहन न मिळाल्याने ग्राहक नाराज होत आहेत. त्यांना निश्चित तारीख सांगणेही कठीण झाले आहे. या कारणावरून ग्राहकांची आवड बदलत आहे. उपलब्ध वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
कार व दुचाकीची विक्री वाढली ()
सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात बूम आहे. कार आणि दुचाकीची विक्री वाढली आहे. काही कारचे वेटिंग आहे. वाहन सर्वांची गरज बनली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कितीही वाढल्या तरीही लोकांना काहीही फरक पडत नाही, हे विक्रीवाढीवरून दिसून येते. लॉकडाऊननंतर ऑटोक्षेत्रात उत्साह आहे. इलेक्ट्रिक व भारतीय वाहनांची खरेदी ही काळाची गरज झाली आहे.
डॉ. पी.के. जैन, एमडी, आदित्य कार्स.
दुचाकी विक्री आणखी वाढणार ()
जानेवारी महिन्यात दुचाकी विक्रीत तेजी आली आहे. ती आताही कायम आहे. शाळा आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर विक्री आणखी वाढणार आहे. कंपन्यांकडून पुरवठा नसल्याने सध्या काही मॉडेलचे वेटिंग आहे. डीलर्सला विक्रीसाठी पुरेसे वाहन मिळत नाही. कंपन्यांना निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. इंधनवाढीनंतरही वाढलेली विक्री आश्चर्य करणारी आहे.
अचल गांधी, संचालक, एके गांधी टीव्हीएस.
कंपनीच्या सर्वच कारला मागणी ()
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतरही मारुतीच्या सर्व मॉडेलला मागणी वाढली आहे. काही मॉडेलला वेटिंग आहे. पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांकडून विचारणा वाढली आहे. वेटिंगमुळे कंपनीकडून पुरवठा वाढविण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात मंदीतील ऑटोक्षेत्राला पुन्हा झळाळी आली आहे.
इलियाज शेख, महाव्यवस्थापक, सेवा ऑटोमोटिव्ह लि.
कारच्या विक्रीवर परिणाम नाही ()
पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा कारच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. ग्राहकांची खरेदी वाढली आहे. मध्यमवर्गीयांवर बजेटचा परिणाम दिसून येत नाही. ते कार खरेदीसाठी पुढे येत आहेत. पेट्रोल कारचा मायलेज वाढला आहे. त्यामुळे विक्री कमी होणार नाही. कंपनीकडून पुरवठा कमी असल्याने काही मॉडेलचे वेटिंग आहे. विक्री पूर्वीप्रमाणेच असून पुढे वाढण्याची शक्यता आहे.
विशाल बरबटे, संचालक, आर्य कार्स.