विश्वचषकाच्या विरहात थोडी जास्तच घेतली; नागपूरात सावजीकडे बसायलाही जागा नव्हती

By नरेश डोंगरे | Published: November 20, 2023 09:18 PM2023-11-20T21:18:58+5:302023-11-20T21:20:48+5:30

आयसीसी विश्वकप २०२३ चे फायनल रविवारी पार पडले. या सामन्यात भारतीय शेर कांगारूची दुसऱ्यांदा शिकार करेल आणि आपण विश्वकप जिंकू, असा अनेकांना विश्वास होता.

Even after losing the World Cup final, hotels, dhabas are full in Nagpur | विश्वचषकाच्या विरहात थोडी जास्तच घेतली; नागपूरात सावजीकडे बसायलाही जागा नव्हती

विश्वचषकाच्या विरहात थोडी जास्तच घेतली; नागपूरात सावजीकडे बसायलाही जागा नव्हती

नागपूर : रात्रीच्या जल्लोषाचे अनेकांचे ईरादे होते. त्यासाठी अनेकांनी तयारी केली होती. काहींनी दुपारीच 'स्टॉक' जमवला होता. ऐनवेळी अडचण नको म्हणून हॉटेल्स, ढाब्यांवरही 'माल' पोहचवला होता. मात्र, जिंकण्याच्या आनंदाऐवजी पराभवाची जखम वाट्याला आली. त्यामुळे जल्लोष होऊ शकला नाही. बाकी सर्व मात्र नियोजित कार्यक्रमानुसार पार पडल्याने शहरातील आणि शहराबाहेरचे बहुतांश सावजीवाल्यांकडे रविवारी रात्री बसायला जागा नव्हती. हॉटेल्स आणि ढाबेही फुल्ल होते.

आयसीसी विश्वकप २०२३ चे फायनल रविवारी पार पडले. या सामन्यात भारतीय शेर कांगारूची दुसऱ्यांदा शिकार करेल आणि आपण विश्वकप जिंकू, असा अनेकांना विश्वास होता. त्यामुळे रविवारी रात्री जोरदार सेलिब्रेशन करायचे, अशी अनेकांनी मानसिकता बनविली होती. त्याची तयारी म्हणून अनेकांनी 'कॉन्ट्री' करून आवश्यक निधी जमविला होता. दुपारीच काही जणांनी 'भाजी' सावजीकडे, ढाबेवाल्यांकडे पोहचवली होती. काहींनी पाच तर काहींनी दहा जणांच्या जेवणांची ऑर्डर नोंदविली होती. मोठा 'स्टॉक' जमवून ठेवला होता. तर, काही जणांनी फायनलची मॅच संपल्यानंतर सर्व वेळवरच बघून घेऊ म्हणत दिवसभर टीव्हीसमोर बसून मॅचचा आनंद घेण्याला प्राधान्य दिले होते. पहिल्या ईनिंगपर्यंत सारेच जण फुल्ल फार्मात होते. मात्र, दुसऱ्या ईनिंगने अनेकांचा जोष कमी केला. 'कांगारू शिकार नव्हे तर शिकारी' बनल्याने सारेच अस्वस्थ झाले होते. अखेर कांगारूने विश्वकप हातून हिसकावून नेला. त्यामुळे सेलिब्रेशनच्या मूड मध्ये असलेले सारेच ऑफ झाले.
टीव्हीला निरोप देत अनेकांनी उरला-सुरला स्टॉक घेऊन शहरातील सावजी आणि शहराबाहेरच्या वेगवेगळ्या हॉटेल्स, ढाब्यांकडे धाव घेतली. काही सावजी आणि ढाबेवाल्यांच्या कथनानुसार, अनेकांनी रात्री ९ नंतरची वेळ दिली होती. मात्र, बहुतांश जण रविवारी रात्री वेळेपूर्वीच धडकले. एकाच वेळी अनेक जण पोहचल्याने सावजी, ढाबे अन् शहराबाहेरचे अनेक हॉटेल रेस्टॉरेंट गर्दीने फुलले. गर्दीमुळे मध्यरात्रीनंतरही अनेक जण वेटिंग होते.

विश्वचषकाच्या विरहात थोडी जास्तच ...
पराभवाचे शल्य असे काही जिव्हारी लागले की अनेकांनी दीड-दोन तास 'ग्लास अन् टेबल' सोडले नव्हते. कोण कसे चुकले अन् विजेता संघातील कुणाची कशी विकेट घेता आली असती, याचे विश्लेषण प्रत्येक जण करीत होता. विश्वचषकाच्या विरहामुळे काही जणांनी थोडी जास्तच घेतली होती. तर, काही जण चक्क पेल्यात बुडण्याच्याच तयारीत असल्याचे जाणवत होते, अशी माहिती प्रतापनगरातील दोन सावजीवाल्यांनी दिली.

वेगवेगळ्या 'डिश'सह 'त्यांची'ही जोरदार तयारी
सुटीच्या दिवशी, खास करून रविवारी बहुतांश मंडळी 'आउटिंगच्या मूड'मध्ये असतात. त्यामुळे नागपूर शहराबाहेरचे बहुतांश ढाबे, सावजी हॉटेल्स गर्दीने फुलतात. नेहमीचा अनुभव असल्याने सावजी, ढाबेवालेही दर रविवारी चांगली तयारी करून ठेवतात. १९ नोव्हेंबरला रविवारी, सर्वत्र 'फायनलचा फिव्हर' राहणार, त्यामुळे रात्री प्रचंड गर्दी होणार, असा साऱ्याच हॉटेल्स, सावजी, ढाबेवाल्यांनी अंदाज बांधला होता. त्यामुळे त्यांनीही वेगवेगळ्या 'डिश'चा भरपूर साठा ठेवला होता. वर्धा आणि अमरावती मार्गावरच्या काही गार्डन रेस्टॉरेंटवाल्यांनी गर्दी आवरत नसल्याने ऐनवेळी बाजुच्या जागेतही टेबल्स वाढविले होते.

Web Title: Even after losing the World Cup final, hotels, dhabas are full in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.