पारा खालावूनही उकाड्याने सारेच त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:39+5:302021-05-18T04:08:39+5:30
नागपूर : मुंबईनंतर गुजरातकडे सरकलेल्या ‘तौउते’ चक्रीवादळाचे पडसाद नागपुरातील आणि विदर्भातील वातावरणात उमटले. हवामान विभागाने वादळ आणि पावसाचा अंदाज ...
नागपूर : मुंबईनंतर गुजरातकडे सरकलेल्या ‘तौउते’ चक्रीवादळाचे पडसाद नागपुरातील आणि विदर्भातील वातावरणात उमटले. हवामान विभागाने वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तो चुकला. मात्र, दिवसभर विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत वातावरण ढगाळलेले होते. वातावरणात दमटपणा असल्याने पारा खालावूनही उकाड्याने सारेच त्रस्त होते.
सोमवारी नागपुरात ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत आकाश ढगाळलेलेच होते. सकाळी वातावरण थंड होते. सकाळची आर्द्रता ७६ नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ती घटून ५८ वर आली. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू असला तरी वातावरणातील दमटपणामुळे उकाडा असह्य होत होता.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सोमवारी पारा खालावलेला होता. अमरावतीमध्ये सर्वांत कमी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर ३७, चंद्रपूर ३७.२, वर्धा ३७.५, गडचिरोली ३७.६, बुलडाणा ३७.७, गोंदिया ३७.८,
यवतमाळ ३८.५ आणि अकोला येथे ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
रविवारी सायंकाळी आणि रात्री विदर्भात काही प्रमाणात पाऊस झाला. नागपुरात मागील २४ तासांत ०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोला ०.६, अमरावती ७.४, गडचिरोली ०.६, वर्धा ०.८, तर वाशिम येथे सर्वाधिक १९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. या पावसामुळे सोमवारी दिवसभर वातावरण प्रचंड दमट झाले होते.
हवामान विभागाने सोमवारी नागपूर जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, सायंकाळपर्यंत नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात पावसाचे आगमन झालेले नव्हते. मंगळवारी १८ मे साठीही हवामान विभागाने असाच अंदाज वर्तविला आहे.