दीड वर्षे होऊनही स्कीन बँक कुलुपातच; आवश्यक साहित्य, मनुष्यबळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 08:45 AM2023-01-18T08:45:00+5:302023-01-18T08:45:02+5:30
Nagpur News मेडिकलने जून २०२१ मध्ये ‘स्किन बँक’ स्थापन केली. मध्य भारतातील ही पहिली बँक ठरली. मात्र, ती चालविण्यासाठी लागणाऱ्या विविध रसायनांपासून ते इतरही साहित्य व मनुष्यबळ उपलब्धच न झाल्याने अद्यापही ही बँक कुलुपातच आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : गंभीर स्वरूपाच्या जळित रुग्णांवर त्वचा प्रत्यारोपणाने (होमोग्राफ्टिंग) जीव वाचविता येतो. यासाठी मेडिकलने जून २०२१ मध्ये ‘स्किन बँक’ स्थापन केली. मध्य भारतातील ही पहिली बँक ठरली. मात्र, ती चालविण्यासाठी लागणाऱ्या विविध रसायनांपासून ते इतरही साहित्य व मनुष्यबळ उपलब्धच न झाल्याने अद्यापही ही बँक कुलुपातच आहे.
विदर्भात आगीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमधून येणारे अपंगत्व, विद्रुपपणा यामुळे जळीतांमधील आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. याला गंभीरतेने घेत प्रसिद्ध प्लास्टीक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांच्या सहकाऱ्याने व रोटरी क्लब, ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि नॅशनल बर्न सेंटर मुंबईच्या मदतीमुळे नागपुरात २७ फेब्रुवारी २०१४ मध्ये पहिली त्वचा बँक सुरू झाली. परंतु विविध कारणांमुळे ऑरेंजसिटी हॉस्पिटलने ही बँक चालविण्यास असमर्थता दर्शवली. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने ही बँक मेडिकलला सुरू करण्याची विनंती केली. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याला होकार देत जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया व यंत्रसामग्रीची दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी जून २०२१ रोजी मेडिकलच्या या ‘स्किन बँके’चे उद्घाटन केले. परंतु प्रत्यक्षात बँकच सुरू झाली नाही.
- स्किन फ्रिझर करण्यासाठी रसायनच नाही
प्राप्त माहितीनुसार, स्किन बँकेची जबाबदारी असलेल्या प्लास्टीक सर्जरी विभागाने उद्घाटनापूर्वी बँक चालविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा प्रस्ताव दिला. परंतु उद्घाटन होऊनही स्किन फ्रिजर करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांसह, ग्लोव्हज व इतरही आवश्यक साहित्य, शिवाय दोन टेक्निशियन, क्लार्क उपलब्धच झाले नाही.
- नव्याने प्रस्ताव सादर करणार
मेडिकलच्या स्किन बँकचे मुख्य अधिकारी व प्लास्टीक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील म्हणाले, या बँकेसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा प्रस्ताव नव्याने अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना देण्यात येईल. अनेक रुग्णांसाठी स्किन बँक जीवनदायी ठरू शकते.