बंदीनंतरही बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीला, महापालिकेचा दावा फोल

By मंगेश व्यवहारे | Published: September 11, 2023 11:10 AM2023-09-11T11:10:19+5:302023-09-11T11:11:18+5:30

चितारओळ परिसरात पीओपीच्या मूर्तींचा कोट्यवधी रुपयांचा साठा

Even after the ban, selling POP idols in the market | बंदीनंतरही बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीला, महापालिकेचा दावा फोल

बंदीनंतरही बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीला, महापालिकेचा दावा फोल

googlenewsNext

मंगेश व्यवहारे

नागपूरशहरात दरवर्षी नायलॉन मांजा व पीओपीच्या मूर्ती ऐन सणांच्या दिवसांमध्ये जागणारा विषय. न्यायालयाने त्यांच्या विक्रीवर बंधने घातल्यावरही, तसेच महापालिकेकडून दरवर्षी उत्सवाच्या काळात कारवाई होत असतानाही बाजारात त्या विक्रीस येतात. यंदाही पालिका प्रशासनाने नागपूर शहरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी मूर्तीची खरेदी-विक्री, साठ्यावर बंदी घातली आहे. दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पण, बाजारात पीओपीच्या मूर्ती विक्रीस आलेल्या आहेत.

‘लोकमत’च्या पथकाने चितारओळ परिसराचा रविवारी आढावा घेतला. विक्रेत्यांनाही पीओपीच्या मूर्तीबाबत विचारले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, या पीओपीच्या मूर्ती आहेत. पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी असल्याबाबत विचारल्यावर म्हणाले की, विक्रीवर बंदी नाही. पीओपीच्या मूर्ती सुबक दिसत असल्याने लोकांची मागणी होते. यंदा पीओपीच्या मूर्तीवर लाल डाग, पांढरा डागही नाही. महापालिका आयुक्तांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार शहरामध्ये पीओपी मूर्तींची खरेदी-विक्री, साठा यावर बंदी घालण्यात आली आहे.

अवैधरीत्या पीओपी मूर्तींची खरेदी-विक्री, साठा करणाऱ्या व्यावसायिकांकडून मूर्तीं जप्त करून व त्यांच्यावर किमान १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा उल्लेख त्यात आहे. चितारओळ परिसरातच सध्या ८ ते १० दुकानांमध्ये पीओपी मूर्ती विक्रीस आहेत. पीओपीच्या मूर्तींचा किमान दोन ते अडीच कोटीचा साठा चितारओळी भागातील गुदामांमध्ये आहे. पीओपीच्या मूर्ती दिसायला सुबक व स्वस्त असल्याने परिसरातील पारंपरिक मूर्तिकारांकडूनही पीओपीच्या मूर्ती विक्रीस प्रोत्साहन मिळत आहे.

पीओपीमध्ये घरगुतीबरोबरच मंडळाच्या गणेशमूर्ती विक्रीस आहे. परिसरातील काही पारंपरिक मूर्तिकार व विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेचे एनडीएस पथक शनिवारी परिसरात येऊन पीओपी मूर्तींच्या विक्रीबाबत जनजागृती करून गेले. पण, कुठेच कारवाई केली नाही.

- १० हजार रुपये दंड की विक्रीचा अधिकृत परवाना

अवैध विनापरवाना मूर्तीची निर्मिती, साठा, वापर व विक्री करीत असल्यास तसेच मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. पण पारंपरिक मूर्तिकारांनी असा आरोप केला की, पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांवर १० हजारांचा दंड करून एकप्रकारे प्रशासन त्यांना अधिकृत विक्रीचा परवाना देते. त्यामुळे हे विक्रेते १० हजारांचा दंड भरून ५ लाखांच्या मूर्तींची विक्री करतात.

पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात नसल्याने पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाद्वारे नोंदणीकृत मूर्ती विक्रेत्यांसाठी संघटनेने त्यांच्या दुकानावर क्यूआर कोडचा फलक जारी दिला आहे. हा फलक असलेल्या मूर्तीच्या दुकानात मातीची मूर्ती मिळणार आहे. तसेच क्यूआर कोडच्या फलकाचा दुरुपयोग करून पीओपीची मूर्ती विकताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

- सुरेश पाठक, अध्यक्ष, पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ

Web Title: Even after the ban, selling POP idols in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.