तिघांचा बळी जाऊनही ‘गाेवरी’चा पूल तयार हाेईना; विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे राेज हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:42 PM2023-02-13T14:42:03+5:302023-02-13T14:48:42+5:30
दाेन वर्षांपासून बांधकाम अर्धवट
आशिष साैदागर
कळमेश्वर (नागपूर) : शहरालगतच्या गाेवरी नदीवरील पुलाच्या बांधकामाला दाेन वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली. या काळात येथे झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर पुलाअभावी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे राेज हाल हाेत असून, हा प्रकार प्रशासनाला माहिती आहे. मात्र, पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने या पुलाचे बांधकाम नेमके कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गाेवरी नदीच्या पलीकडे कळमेश्वर शहरातील अनेकांची शेती असून, या मार्गावरील खैरी, गोवरी, तिष्टी, पारडी, तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी यासह अन्य गावांमधील शेकडाे विद्यार्थी व शेतकरी याच पुलावरून कळमेश्वर शहरात आठवडी बाजारासह अन्य शासकीय व वैद्यकीय कामांसाठी राेज येतात आणि कळमेश्वर शहरातील शेतकरी त्यांच्या शेतीची वहिवाट करतात. त्यामुळे या राेडसह पुलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या नदीवर पाच सिमेंटचे माेठे पाइप टाकून रपटावजा कमी उंचीचा व अरुंद पूल फार पूर्वी तयार करण्यात आला. दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने तसेच इतर गावांचा शहराशी संपर्क तुटत असल्याने या ठिकाणी नव्याने उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी पुढे आली. त्याअनुषंगाने राज्य सरकारने पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला. पुलाचे काम वर्षभरात पूर्ण हाेणे अपेक्षित असताना दाेन वर्षे पूर्ण हाेऊनही ते पायव्याच्या पुढे सरकले नाही. मागील काही महिन्यांपासून कंत्राटदाराने बांधकाम बंद केले आहे. त्याचे कारणही कुणी सांगायला तयार नाही.
या पुलाचे बांधकाम स्ट्रक्चर प्रोजेक्ट आर्च न बनवता सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंत्राटदार कंपनीला अद्याप पुलाचा स्ट्रक्चर आर्च न मिळाल्याने काम बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या पुलाच्या अंदाजे ३० टक्के कामावर ८० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. बांधकाम कालावधी वाढणार असल्याचे खर्चही वाढणार आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
सात गावांचा संपर्क तुटताे
हा पूल कळमेश्वर तालुक्यातील खैरी, गोवरी, तिष्टी, पारडी, तोंडाखैरी, बेल्लोरी व सिल्लोरी महत्त्वाच्या गावांना कळमेश्वर शहराशी जाेडताे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे या गावांचा शहराशी संपर्क तुटताे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना पूर ओसरेपर्यत तासनतास प्रतीक्षा करीत नदीच्या काठावर उभे राहावे लागते. शिवाय, पुलावरून पुरात वाहून जाण्याचीही भीती असते. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
२.९५ काेटी रुपयांचा निधी मंजूर
गाेवरी नदीवरील पुलाच्या बांधकामाला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत जानेवारी २०२१ मध्ये त्यासाठी दाेन काेटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामाचे नागपूर शहरातील कंत्राट श्री साई बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. कंपनीला या पुलाचे बांधकाम १२ महिन्यात म्हणजे जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे हाेते. मात्र, या ठिकाणी पायव्याव्यतिरिक्त काेणतेही काम आजवर करण्यात आले नाही.
बांधकाममध्येच बंद केल्याने कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनस्तरावर स्ट्रक्चर आर्चबाबत कार्यवाही केली जात आहे. यात शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतल्या जात आहे. नव्याने निविदा काढून उर्वरित बांधकाम प्रक्रिया रेग्युलर कन्व्हर्ट करून ते लवकरच पूर्ण केले जाईल.
- रुपेश बोधडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर