सप्टेंबरच्या शेवटीही पावसाचा विराम, लवकरच करेल रामराम
By निशांत वानखेडे | Published: September 30, 2024 06:59 PM2024-09-30T18:59:49+5:302024-09-30T19:01:38+5:30
नागपूर आतापर्यंत १०५६ मि.मी. : विदर्भातही १५ टक्के अधिक पाऊस
नागपूर : दरवर्षी येणाऱ्या पावसाळा ऋतुचे चार महिन्याचे चक्र सप्टेंबरचा शेवटचा दिवस म्हणजे साेमवारी संपले. शेवटच्या आठवड्यात पावसाचा जाेर असेल, असा अंदाज हाेता. मात्र महिन्याच्या शेवटीही पावसाने विराम घेतला. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस म्हणजे ५ ऑक्टाेबरपर्यंत पावसाबाबत कुठलाही अंदाज व्यक्त केला नसल्याने आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पाऊस लवकरच विदर्भातून गाशा गुंडाळेल, अशी शक्यता आहे.
यंदा २१ जूनपासून पावसाचे आगमन झाले पण जाेर उशीराच म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाढला. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात फारसा प्रभावी नसलेला पाऊस दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र तीव्रपणे बरसला. २० जुलैपासून मुसळधार बरसलेल्या पावसाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा बॅकलाॅग दूर केला. या काळात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया या जिल्ह्यातील बऱ्याचा गावांचा पुरामुळे संपर्क तुटला हाेता. जुलैप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही पावसाने कमी दिवसात जास्त बरसात केली.
सप्टेंबर महिन्यात सहसा पावसाचा जाेर कमी असताे. मात्र गेल्या वर्षी पावसाची तीव्रता अधिक हाेती. नागपुरात २३ सप्टेंबरला बरसलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली व तीन हजाराहून अधिक घरात पाणी शिरले हाेते. चार लाेकांचा जीवही गेला. यंदा मात्र पावसाने सप्टेंबर महिन्यात राैद्र रूप धारण केले नाही.
दरम्यान पावसाळ्याच्या सीजनमध्ये नागपुरात आतापर्यंत १०५६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. सीजनमध्ये नागपूर जिल्ह्यात ९७४ ते १००० मिमी पाऊस पडताे. म्हणजे यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस नाेंदविला गेला आहे. विदर्भातही आतापर्यंत सरासरी १०६५ मि.मी. पाऊस झाला असून सरासरीपेक्षा ताे १५ टक्के अधिक आहे.
१५ ऑक्टाेबरनंतर थंडीची चाहुल
साधारण ५ ऑक्टोबरला मान्सून माघारी परतत असताना महाराष्ट्राच्या उत्तरेकडे निघतो व १५ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून बाहेर पडतो. याच दरम्यान राज्यात मान्सूनच्या शेवटच्या आवर्तनाचा पाऊस होत असतो. गेल्या वर्षी मान्सून शांतपणे परतला होता. यावर्षी ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडण्याची शक्यता जाणवते. १५ ऑक्टाेबरनंतर थंडीची चाहूल लागेल, अशी शक्यता आहे.