रक्ताच्या नात्यांनाही दुरूनच बघावे लागतात अंत्यसंस्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:58+5:302021-05-06T04:07:58+5:30
बेवारस मृतांचे वाली मनपा कर्मचारी : इच्छा असूनही धार्मिक विधी नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट ...
बेवारस मृतांचे वाली मनपा कर्मचारी : इच्छा असूनही धार्मिक विधी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. आणखी किती दिवस कायम राहील, हे सांगता येणार नाही. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ८२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उपचाराच्या वेळी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची सेवा करता आली नाही. अंत्यसंस्कार मनपा कर्मचाऱ्यांनी केले. संक्रमणाच्या भीतीमुळे इच्छा असूनही कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यसंस्कारही दुरूनच बघावे लागत आहे, असे वेदनादायी चित्र आज शहरातील सर्वच घाटावर बघायला मिळत आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संक्रमणाची शक्यता असल्याने मनपा कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. मृतदेह रुग्णालयातून थेट घाटावर नेला जातो. एखाद्याचा गृहविलगीकरणात उपचार घेताना मृत्यू झाला तरी मनपाचेच कर्मचारी येतात आणि अंत्यसंस्कार करतात. कुटुंबातील लोकांना दुरूनच अंत्यसंस्कार बघावे लागतात. धार्मिक विधी करता येत नाही. बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना फक्त मनपाच कर्मचारी असतात. यावेळी त्यांचे नातेवाईकही नसतात.
....
वर्षभरात जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू - ७,८२८
कोरोनामुळे शहरात झालेले मृत्यू - ४,७३३
कोरोनामुळे ग्रामीणमध्ये झालेले मृत्यू - १९८०
कोरोनामुळे जिल्ह्याबाहेरील मृत्यू - १११५
....
पाच जणांना परवानगी, पण नशिबी तेही नाही
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच जणांना पीपीई किट घालून परवानगी आहे. परंतु काही कुटुंबातील सदस्य संक्रमणाच्या भीतीमुळे मनपा कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करवून घेतात. शहरात वर्षभरात अशा दोन हजाराहून अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्तातील पाच माणसेही उपस्थित नव्हते.
...
अनेक जण घाटावर येण्याचे टाळतात
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कार करीत नाही. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीवर येण्याचे टाळतात. त्यांना आपल्या जीवाची भीती आहे. दुसरीकडे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अनेक जण चांगले वागत नाही. असे असूनही पथकातील कर्मचारी वाद न घालता आपले कर्तव्य बजावत आहेत.
...
वर्षभरापासून अंत्यसंस्काराचे काम
मृतदेह गाडीत ठेवण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व कार्य आमच्या टीमला करावे लागते. अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतो. सॅनिटायझर व किटचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. मागील वर्षभरापासून करीत आहे. नातेवाईक घाटावर येतात, परंतु संक्रमणाच्या भीतीमुळे दूर उभे असतात.
विनोद अंभोरे, कर्मचारी
....
खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार
कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करताना खबरदारी घ्यावीच लागते. सुरक्षा म्हणून पीपीई किट, मास्क व विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालून व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. घाटावरून घरी परतल्यानंतर दाराबाहेर कपडे, बूट काढून स्वत: निर्जंतूक व्हावे लागते. मागील वर्षभरापासून हा नित्यक्रम सुरू आहे.
रमेश कुणावत सफाई कर्मचारी