नागपूरच्या अनाथालयातील बच्चे कंपनींचा असाही रंगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:28 PM2019-03-22T21:28:13+5:302019-03-22T21:34:17+5:30
अनाथाचा ठपका घेऊन जगणारी मुले-मुली गुरुवारी मस्त रंगात भिजली. धावून धावून एकमेकांना रंगात-पाण्यात बुडविले. पिचकाऱ्या उडवल्या, गुलाल उधळला. पोलीस अधिकाऱ्यांना घेरून त्यांच्या तोंडाला गुलाल फासला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या कल्पनेमुळे अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनाथालयातील मुला-मुलींनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. या बच्चे आणि किशोरवयीन मुलांमुलीसोबत पोलीस अधिकारीही त्यांचे मित्र बनत रंगले, रंगात न्हाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनाथाचा ठपका घेऊन जगणारी मुले-मुली गुरुवारी मस्त रंगात भिजली. धावून धावून एकमेकांना रंगात-पाण्यात बुडविले. पिचकाऱ्या उडवल्या, गुलाल उधळला. पोलीस अधिकाऱ्यांना घेरून त्यांच्या तोंडाला गुलाल फासला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या कल्पनेमुळे अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनाथालयातील मुला-मुलींनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. या बच्चे आणि किशोरवयीन मुलांमुलीसोबत पोलीस अधिकारीही त्यांचे मित्र बनत रंगले, रंगात न्हाले.
अनाथाचे जगणे नशिबी आलेली बच्चे कंपनी सणोत्सव केवळ दुरूनच बघतात. खूप इच्छा असूनही त्यांना कोणत्याच सणोत्सवाचा आनंद मनसोक्तपणे घेता येत नाही. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार कर्तव्यकठोर आहेत अन् संवेदनशिलही! कधीतरी त्यांनी अनाथालयातील मुलांच्या या अवस्थेला हेरले अन् होळी-धुळवडीचा बंदोबस्त आटोपल्यानंतर धुळवडीचा सण त्यांच्यासोबत साजरा करण्याचा मानस आपल्या परिमंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केला. तशी तयारी करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार कामठीचे ठाणेदार किशोर नगराळे आपल्या सहकाऱ्यांसह कामी लागले. बुधवारी सायंकाळपासून होळीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून धुळवडीचा बंदोबस्त आटोपला. त्यानंतर उपायुक्त पोद्दार यांच्यासह सहायक आयुक्त परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येत गणवेषातच कामठीच्या कस्तूरचंद डागा बालसदनात पोहचले. तेथील बच्चे कंपनीला आधीच कल्पना देऊन ठेवण्यात आली होती. सर्वांना पिचकाऱ्या, वेगवेगळा रंग, गुलालही आधीच पोहचवण्यात आले होते. त्यामुळे बच्चे कंपनी वाटच बघत होती. पोलीसदादा पोहचताच त्यांनी एकच हो-हल्ला केला. पोलीस उपायुक्त पोद्दार यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना बच्चे कंपनीने घेरले. तोंडाला गुलाल फासला. रंग लावला. एकमेकांवर पिचकाऱ्या उडवल्या. रंग उधळला. एकमेकांना चिंब केले. अनाथालयाच्या परिसराने पहिल्यांदाच एवढा आनंद, उत्साह अनुभवला होता.
आतापर्यंतचा खरा रंगोत्सव
सुमारे दोन तास मोठी मौजमस्ती चालली. नंतर गाठ्या, गोडधोड मिठाई झाली. मुले अगदीच आनंदात न्हाऊन निघाली होती. ज्यांनी हा आनंदोत्सव त्यांच्यासाठी आयोजित केला होता, त्या पोलीसदादात कुणी वडील बघितला. कुणी भाऊ बघितला तर कुणी आपला मामा, काका अन् पालकांचे रूप बघितले. त्यांच्यासोबत त्यांनी फोटो, सेल्फीही काढून घेतल्या. ही धुळवड या बच्चेकंपनीच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील खरा रंगोत्सव ठरली.