कोरोना संकटातदेखील ‘व्हीएनआयटी’तील ‘प्लेसमेंट’मध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 10:47 AM2021-08-05T10:47:35+5:302021-08-05T10:49:19+5:30
Nagpur News एकीकडे कोरोनामुळे देशभरातील शिक्षणसंस्था अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत असताना नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ने मात्र चमकदार कामगिरी केली आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे कोरोनामुळे देशभरातील शिक्षणसंस्था अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत असताना नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ने मात्र चमकदार कामगिरी केली आहे. कोरोनाचा काळ असूनदेखील दीडशेहून कंपन्या ‘व्हीएनआयटी’त आल्या व मागील वर्षीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. मागील नऊ वर्षांत ‘व्हीएनआयटी’मधील ‘प्लेसमेंट’चा ‘ग्राफ’ चढता राहिला आहे.
देशातील अग्रणी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढलेला दिसून आला. वर्षभरात पात्र असलेल्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. ३० जूनपर्यंत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम मिळून ४९७ विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले होते. वर्षभरात १५८ कंपन्या ‘व्हीएनआयटी’तील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आल्या. काही मुलाखती थेट ‘ऑनलाईन’च झाल्या. बी.टेक.च्या ४४३ विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले होते.
वर्षभरातच १० टक्क्यांनी वाढ
२०१९-२० मध्ये कोरोनाची सुरुवात झाली होती व त्या वर्षात ‘व्हीएनआयटी’तील ५२१ विद्यार्थी ‘प्लेसमेंट’साठी पात्र होते. १३० कंपन्यांकडून यातील ४४९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘प्लेसमेंट’ची ‘ऑफर’ मिळाली. २०२०-२१ मध्ये हाच आकडा सुमारे १० टक्क्यांनी वाढला आहे. २०२०-२१ मध्ये प्लेसमेन्ट झालेले सर्वाधिक १०० विद्यार्थी हे संगणक विज्ञान शाखेचे आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या ७४ तर यांत्रिकी अभियांत्रिकीच्या ६७ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले.
आयटीसोबतच स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्थांकड़े ओढा
काही वर्षांअगोदर कोअरसह आयटी कंपन्यांमध्येच ‘प्लेसमेंट’ व्हावे यावर विद्यार्थ्यांचा भर असायचा. परंतु आता स्थिती बदलली आहे. २०२०-२१ मध्ये स्टार्टअप्सलादेखील काही विद्यार्थी रुजू झाले आहेत. सोबतच शैक्षणिक संस्था, सल्लागार संस्थाप्रतिदेखील विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे.