जरीपटक्यात दुहेरी हत्याकांड पत्नीसह भाच्यालाही संपविले
By admin | Published: October 18, 2015 03:13 AM2015-10-18T03:13:13+5:302015-10-18T03:13:13+5:30
मेव्हण्याने फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका नराधमाने पत्नी आणि मेव्हण्याच्या मुलाची (भाच्याची) निर्घृण हत्या केली.
नागपूर : मेव्हण्याने फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका नराधमाने पत्नी आणि मेव्हण्याच्या मुलाची (भाच्याची) निर्घृण हत्या केली. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीला नगरात (नारी) हा थरार घडला. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तर नागपुरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गोपीबाई कांबळे (वय ५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. चिमुकल्यासह पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना संपवणाऱ्या नराधमाचे नाव शरनू ऊर्फ अण्णाजी कांबळे (वय ६०) आहे.
आरोपीचे घर तक्षशिलानगरात असून, त्याला तीन मुली आहेत. या तिन्हींचे विवाह झाले असून, त्या पुण्यात राहतात.
आरोपी शरनू दारुड्या आहे. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो मिळेल काम करतो. त्याचा कवडीचा हातभार नसल्यामुळे गोपीबाई भाजी विकून नवऱ्याला पोसायची. गोपीबाईचे माहेर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव येथे आहे. तिचे भाऊ मधुकर रामपुरे यांचा मुलगा चेतन गोपीबार्इंकडे शिक्षणाच्या निमित्ताने राहतो.
तो नारीच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होता. आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या चेतनवर आत्या गोपीबाईची विशेष माया होती. चेतनही शाळा आटोपल्यानंतर आत्याला भाजी विकण्यास मदत करायचा. तो आत्याचा पदर सोडत नव्हता. (प्रतिनिधी)
फोनने केला घात
शरनूला दारू चढल्यानंतर त्याचे स्वत:वर नियंत्रण राहत नव्हते. घरी येऊन तो मध्यरात्रीपर्यंत बडबड करायचा. त्यावरून पत्नी गोपीबाईसोबत त्याचे नेहमीच भांडण व्हायचे. शुक्रवारी रात्री आरोपी शरनू नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झोकांड्या देतच घरी आला. त्याने अंगणात उभे राहून शिवीगाळ सुरू केली. गोपीबाईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिला त्याने मारहाण केली. चेतनलाही शिव्या घातल्या. नेहमीच्या कटकटीला कंटाळलेल्या गोपीबाईने आपल्या भावाला फोन करून ही माहिती दिली. ते ऐकून संतप्त झालेल्या मधुकर रामपुरे यांनी लगेच शरनूला फोन देण्यास सांगितले. शरनूने फोन घेताच त्याच्याशी रामपुरेंची बाचाबाची झाली. शरनू शिवीगाळ करीत असल्यामुळे रामपुरेंनी त्याला फोनवरूनच हातपाय तोडण्याची धमकी दिली. ती ऐकून शरनूचा पारा चढला. त्याने रामपुरेंसह पत्नीचाही उद्धार करणे सुरू केले. मध्यरात्र झाली तरी त्याचा राग कमी झाला नव्हता.
परिसरात थरार, आरोपी पसार
गोपीबाई आणि चेतनच्या किंकाळ्या ऐकून जागे झालेल्या शेजाऱ्यांनी शरनूच्या घराकडे पाहिले. आक्रित घडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी परिसरातील अन्य काहींना जागविले. त्यामुळे नराधम शरनू बाहेर पळाला. दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्याने जरीपटक्याचा ताफा घटनास्थळी पोहचला. शरनूच्या घरात गोपीबाई आणि तिच्या भाच्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने शेजारीच नव्हे तर पोलिसांच्या अंगावरही काटा उभा राहिला. त्यांनी लगेच शरनू पळालेल्या दिशेने धाव घेऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला शनिवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. या हत्याकांडामुळे तक्षशिला नगरात तीव्र शोककळा पसरली आहे.
किंकाळ्यांनी हादरला परिसर
आरोपी रात्रभर जागाच होता. त्याने घरातील जंगलेली कुऱ्हाड शोधली. पहाटे २.३० च्या सुमारास तो गोपीबाईच्या जवळ गेला आणि त्याने तिच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. गोपीबाईच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला.