तिजोरी खाली तरीही नागपुरात २०२ कोटींच्या विकास कामांची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:33 AM2018-02-27T10:33:32+5:302018-02-27T10:34:32+5:30
कर्मचाऱ्यांनाही वेतन देण्यासाठी वित्त विभागाला दर महिन्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते. असे असतानाही मंगळवारी होणाऱ्या नागपूर स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडसह विकास कामांचे तब्बल २०२ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. प्रभागातील विकास कामांसाठी मागणी करूनही निधी मिळत नसल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. कंत्राटदारांची गेल्या काही महिन्यापासून ७० कोटींची बिले प्रलंबित आहेत. निधीअभावी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची कामे अर्धवट वा अद्याप सुरुवात झालेली नाही. मनुष्यबळाचा अभाव असूनही रिक्त पदांची भरती रखडलेली आहे. कर्मचाऱ्यांनाही वेतन देण्यासाठी वित्त विभागाला दर महिन्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते. असे असतानाही मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडसह विकास कामांचे तब्बल २०२ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची कामे अर्धवट आहेत. सुरू असलेली कामे संथ आहेत तर काही कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. दोन टप्प्यातील कामे अपूर्ण असताना स्थायी समिती अध्यक्षांचा कार्यकाळ संपताना समितीच्या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील १८० कोटींच्या सिमेंट रोडच्या कामांना मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु शहराच्या विविध भागातील २५ ते ३० सिमेंट रोडच्या कामांचा यात समावेश आहे. यासाठी महापालिका आपल्या वाट्याचा निधी कसा उपलब्ध करणार, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी जून महिन्यात २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु जीएसटीने सत्ताधाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. मावळत्या वित्त वर्षात महापालिकेच्या तिजोरीत फार तर १५०० ते १६०० कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिक ट असल्याने गेल्या दिवाळीपर्यंत स्थायी समितीकडे नवीन कामाचा एकही प्रस्ताव आला नव्हता. जे प्रस्ताव वा योजना मंजुरीसाठी आल्या त्या शासनाच्या निधीतील होत्या. त्यामुळे २०२ कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार, असा प्रश्न पडला आहे.
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करापासून मावळत्या वित्त वर्षात ३९० कोटींचा महसूल अपेक्षित होता. परंतु फेब्रुवारीअखेरीस हा आकडा जेमतेम १६० कोटीपर्यंत पोहोचला आहे. पुढील एक महिन्यात फार तर यात १५ ते २० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. पाणीपट्टी, नगर रचना व बाजार विभागाचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही.
रोडची कामे रखडण्याची शक्यता
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. अर्धवट व संथ कामामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अनेक मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू आहे. काही मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. आधीची मंजूर कामे पूर्ण न करता नवीन कामे सुरू केल्यास शहरातील वाहतूक विस्कळीत होणार आहे. आधीच मेट्रो रेल्वेच्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात पुन्हा सिमेंटरोडची भर पडण्याची शक्यता आहे.