मुले कमावती असली तरीही पत्नीला पोटगी द्यावीच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 06:48 AM2021-01-30T06:48:16+5:302021-01-30T06:48:29+5:30
कुटुंब न्यायालयाने पत्नी कलावतीला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केल्यामुळे पती वसंतरावने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राकेश घानोडे
नागपूर : मुले कमावती असली तरीही पत्नीला पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. पत्नीचे पालनपोषण करणे हे पतीचे प्राथमिक दायित्व आहे, असेदेखील कोर्टाने म्हटले.
कुटुंब न्यायालयाने पत्नी कलावतीला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केल्यामुळे पती वसंतरावने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कलावती चार मुलांकडे रहात असून चारही मुले कमावती आहेत. त्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही. तिचे पालन-पोषण करण्याची आपली जबाबदारी नाही, असे वसंतरावने याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने वसंतरावचे हे मुद्दे आधारहीन ठरवले. केवळ मुले कमावती असल्यामुळे पत्नीची देखभाल करण्याच्या जबाबदारीतून पती मोकळा होत नाही, असे न्यायालयाने बजावले. याशिवाय वसंतरावने कलावती बुटीक चालविते व ती एका भाडेकरूकडून पाच हजार रुपये महिना भाडे मिळवते, असाही दावा केला होता. न्यायालयाने यासंदर्भात रेकॉर्डवर काहीच पुरावे नसल्याचे नमूद करून वसंतरावचे हे दावेही फेटाळले.