कोरोनावर मात केली तरी प्रतिबंधक लस आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:12+5:302020-11-29T04:06:12+5:30
नागपूर : भारतीयांचा ‘कोविड रिकव्हरी’ दर ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनावर मात केली असली तरी प्रतिबंधक लस घेण्याची गरज ...
नागपूर : भारतीयांचा ‘कोविड रिकव्हरी’ दर ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनावर मात केली असली तरी प्रतिबंधक लस घेण्याची गरज असल्याची माहिती, संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. फेब्रुवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची यादी तयार केली जात आहे. परंतु लसीकरणाला घेऊन सोशल मीडियावर अनेक चुकीचे मॅसेज व व्हिडिओ व्हायरल होत असल्याने यावर ते बोलत होते.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, कोरोनावर मात करण्याचा दर आपल्याकडे जास्त असला तरी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी लस आवश्यक आहे. कारण आपल्याकडे वैद्यकीय सुविधा मर्यादित आहे. प्रतिबंधक लसीमुळे कमीत कमी रुग्ण रुग्णालयात दाखल होतील.
-प्रतिबंधक लस डीएनएमध्ये बदल करते का?
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. शिंदे म्हणाले, कोरोनावरील प्रतिबंधक लस मानवी डीएनएमध्ये मूलत: कुठलाही बदल करीत नाही. काही सोशल मीडियावर या संदर्भात चुकीचे मॅसेज, व्हीडीओ व्हायरल होत आहे. लोकांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक आहे.
-सामुदायिक लसीकरणामुळे सामान्य स्थिती येईल का?
सामुदायिक लसीकरणामुळेच रोग प्रतिकारशक्ती वाढून अर्थव्यवस्थेत सामान्यपणा येऊ शकते, असे मतही डॉ. शिंदे यांनी नोंदविले.
-कुटुंबात प्रथम कुणाला लस दिली पाहिजे?
वृद्ध, हेल्थ वर्कर आणि कन्टेंन्मेंट झोनच्या जोखमीच्या लोकांना प्रतिबंधक लसीसाठी प्राधान्य दिले पाहिजे. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. यामुळे संसर्गाचा प्रसार होणार नाही.
- कोविड लस सुरक्षित आहे का?
बऱ्याच मॉडर्न लस सुरक्षित आहेत. आपल्याकडे कोविड प्रतिबंधक लसीची पुरेशी माहिती आहे. ज्यामुळे ती सुरक्षित असल्याची खात्री पटते.
-लस प्रभावी आहे का?
प्रतिबंधक लस ७० ते ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.
-लसीकरणामुळे या साथीचा रोगाचा नाश होऊ शकतो?
प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकांनी घेतल्यास या साथीचा रोगाचा नाश होऊ शकतो, असे मतही डॉ. शिंदे यांनी मांडले.