पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !
By गणेश हुड | Published: June 24, 2023 05:27 PM2023-06-24T17:27:53+5:302023-06-24T17:28:28+5:30
निधीसाठी शासनाचा हात आखडता
नागपूर : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर मार्गांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते मागील सात-आठ वर्षात दुरुस्त झाले नसल्याने पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना अडचणंचा सामना करावा लागणार आहे. रस्ते नादुरुस्त असल्याने अनेक गावातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
मागील वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. याचा विचार करता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडे ६० कोटींची मागणी केली होती. मात्र फक्त ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पुलाचे बांधकामही शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामीण मार्ग (व्हीआर), पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते. या रस्ते पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सरकारकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. गेल्या पाच वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी जि.प.कडून सरकारकडे ३२९ कोटींच्यावर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र शासनाकडून फक्त ११५ कोटी मिळाले.
मागितले ६६ कोटी मिळाले ५ कोटी
२०२१-२२ या वर्षात जि.प.च्या बांधकाम विभागाला ४५ कोटींचा निधी मंजूर होता. तर २०२२-२३ या वर्षात ४७ कोटींची मागणी जिल्हा नियोजनकडे केली होती. परंतु ४५ कोटी कामांनाच स्थगिती होती. तर २०२३-२४ या वर्षात ६६ कोटींची मागणी केली होती. मात्र जिल्हा नियोजनकडून फक्त ५ कोटींचा निधी मिळाला.