जीव गेला तरी बेहत्तर काँग्रेससाठी सभा घेणारच
By admin | Published: February 12, 2017 02:17 AM2017-02-12T02:17:28+5:302017-02-12T02:17:28+5:30
महापालिकेत काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी चांगले काम करणाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली.
अशोक चव्हाण : संघ व भाजप विरोधात आमची लढाई
नागपूर : महापालिकेत काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी चांगले काम करणाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे काही जण नाराज आहेत. प्रत्येकच पक्षात असे असंतुष्ट लोक असतात. परंतु काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मदत करीत आहे. त्यांचे हे प्र्रयत्न हाणून पाडू. पक्षासाठी जीव गेला तरी बेहत्तर याची मला पर्वा नाही. पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेणारच, असा निर्धार माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त दिला.
हसनबाग चौकात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. काही असंतुष्टांनी सभा सुरू असतानाच शाई फेकण्याचे कृ त्य केले. भ्याडपणाचा हा प्रकार आहे. ज्या कोणी हे कृ त्य केले, त्याचा निषेध करतो. अशा घटनांना सडेतोड उत्तर देऊ. अशा घटनातून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
संघ व भाजपला रोखण्याची गरज आहे. सर्वसामान्यांची ही लढाई आहे. यासाठी जे सोबत येईल, त्यांना सोबत घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे लोक खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप करतात. परंतु तुम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री असूनही आरोप करीत आहात. म्हणजेच तुम्ही सरकार चालवू शकत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा असल्याचे सांगतात. परंतु राजीनामा कधी देणार,असा प्रश्न उपस्थित करून भाजप व शिवसेना यांच्यात संगनमत असून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातच नागपूर शहराचा विकास झाला.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूरच्या विकासासाठी निधी दिला. काँग्रेसच्याच काळात मिहान, मेट्रो यासारखे प्रकल्प मंजूर करण्यात आले.
महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली तर शहराचा जलद विकास करू, असे आश्वासन देत २०१९ निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.(प्रतिनिधी)