शाळा बंद असली, तरी पाठ्यपुस्तके मिळणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:55+5:302021-06-16T04:09:55+5:30
मंगेश व्यवहारे नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून पुस्तके नक्कीच मिळणार आहे. जिल्हा परिषदेने ...
मंगेश व्यवहारे
नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून पुस्तके नक्कीच मिळणार आहे. जिल्हा परिषदेने १ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांसाठी यंदा ८ लाख २ हजार रुपयांची डिमांड बालभारतीकडे पाठविली आहे. यंदा २६ जून रोजी शाळा सुरू होईल की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे, पण पुस्तक मिळणार. मात्र, ते कधी याबाबत तिथी अजूनही निश्चित नाही.
दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात येते. २०२० हे वर्ष त्याला अपवाद ठरले. कारण कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू होऊ शकल्या नव्हत्या. यंदाही परिस्थिती सारखीच आहे. समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचा आकडा निश्चित करून पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. नागपूर जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ९४७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी जिल्ह्याचा पाठ्यपुस्तकाचा बजेट ३ कोटी रुपयांचा आहे.
बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. २६ जूनपर्यंत शाळेशाळेत पुस्तक उपलब्ध करून दिली जाते. २६ जूनला अजूनही १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, पण पुस्तके अजूनपर्यंत शाळेत पोहोचली नाहीत. कदाचित, बालभारतीनेही शाळा वेळीच सुरू होणार नाही, हा अंदाज घेऊन नियोजन केले नसेल.
- पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापर योजनेला अपेक्षित प्रतिसाद नाही
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर, २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती. नागपूर जिल्ह्यातील पालकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ८,८०६ पालकांनीच पुस्तके परत केली. त्यामुळे गेल्या वर्षी ८,०५,६३२ पुस्तकाची मागणी शिक्षण विभागाने केली होती. या वर्षीही ८,०२,०३१ ऐवढ्या पुस्तकाची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली आहे.
- तालुकानिहाय पुस्तकांची मागणी
तालुका मागणी
कामठी ८६,४१३
हिंगणा ८२,३०२
नागपूर ग्रामीण ७३,६८३
उमरेड ६३,५५७
भिवापूर ३४,६८०
कुही ५५,८८६
रामटेक ६९,६७९
मौदा ५७,०८०
पारशिवनी ४८,९७५
काटोल ५८,०१८
नरखेड ५३,१७७
सावनेर ७१,४३४
कळमेश्वर ४७,१७०